BJP NEWS । राम शिंदे अ‍ॅक्शन मोडवर, कर्जतमध्ये बुधवारी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा व रास्ता रोको अंदोलन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत तालुक्यातील जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे हे ॲक्शन मोडवर आले आहेत. कर्जत तालुक्यातील बळीराजा विविध संकटाचा सामना करत आहे. मात्र लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जनतेचे प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांनी बुधवारी अंदोलनाची हाक दिली आहे. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमध्ये भव्य मोर्चा व रास्ता रोको अंदोलन होणार आहे. याबाबत कर्जत भाजपच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

कर्जत भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या अडीच वर्षापासुन प्रलंबित असुन त्यामुळे शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेती पंपासाठी लागणारी वीज पुर्ण दाबाने तसेच पुर्ण वेळ मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्या अभावी जळुन चाललेली आहेत. त्यावर महावितरण व सरकार यांच्या सहमतीने शेती पंप वीज देयकांची पठाणी वसुली चालु आहे. त्यासाठी शेती पंपाचे ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात येत आहेत. हातचे पिक नष्ट होऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट होत आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.

पुढे निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षापासुन कुकडी आवर्तन नियोजनाचा पुर्णपणे बोजावरा उडाल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे कुकडी लाभ क्षेत्रातील बागायती क्षेत्र उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. 25 मार्च रोजी प्रशासनाने जाहिर केलेल्या कुकडी आर्वतनाचा शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची पिके जळुन जातील त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी कुकडीचे तत्काळ आवर्तन सोडण्यात यावे.

जलयुक्त शिवारच्या माध्यमांतून सशक्त झालेल्या जलस्त्रोतामुळे तालुक्यात बहरलेली ऊस शेती आज ऊस तोडणी अभावी संकटात आलेली आहे. बहुतांश क्षेत्रातील ऊसाने तुरा फेकलेला आहे. ऊस तोडणीचे दिवस पुर्ण होऊन गेलेले आहेत. तरी देखील जाणीवपूर्वक तालुक्यातील ऊस तोडण्यास दिरंगाई केली जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा सहकारी कारखाना कवडीमोल भावाने खरेदी करुन आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडवणुक करुन पिळवणुक केली जात आहे असे निवेदनात म्हटले आहे. 

कर्जत भाजपने प्रशासनाकडे केलेल्या मागण्या खालील प्रमाणे

1) वीज देयक वसुली मुळे होणारी वीज तोडणी तत्काळ थांबवावी आणि पुर्ण दाबाने नियमित वीज मिळावी. जळालेले ट्रान्सफॉर्मर 24 तासांत वीज वितरण कंपनीच्या माध्यामांतुन तत्काळ बदलुन मिळावेत.

2) कुकडीचे आवर्तन जाहीर झालेल्या 25 मार्चच्या आधीच चालू पिकासाठी तत्काळ व ताबडतोब सोडण्यात यावे. तसेच कुकडीचे आवर्तन नियमित व पुर्ववत करावेत.

3) कर्जत तालुक्यातील जी ऊसतोड बाकी आहे त्यासाठी त्वरीत अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन तत्काळ ऊसतोड करावी.

कर्जत भाजपच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनावर अंबादास पिसाळ, सचिन पोटरे, सुनिल यादव, काका धांडे, गणेश क्षीरसागर, पप्पूशेठ धोदाड, बबन लाढाणे, शेखर खरमरे,शरद म्हेत्रे, संजय भैलूमे, सागर कांबळे, पांडुरंग क्षीरसागर, दत्ता कदम, सोयब काझी, विजय साळवे सह आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.