राम शिंदेंचा रोहित पवारांवर खळबळजनक आरोप, राम शिंदे म्हणतात रोहित पवारांनी चोंडीतील 80 एकर जमीन हडपली, राज्याच्या राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। पवार साहेबांचे नातू आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांनी स्थानिक संस्थेशी तडजोड करून आणि प्रशासनाला हाताशी धरून चोंडीतील 80 एकर जमीन हडप केली असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (Ram Shinde’s sensational allegations, Ram Shinde says Rohit Pawar grabbed 80 acres of land in Chondi )
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी 30 मे रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि आमदार रोहित पवार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. राम शिंदेंनी केलेल्या आरोपांमुळे कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, दरवर्षी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता, कुठलाही झेंडा न ठेवता, फक्त आणि फक्त अहिल्यादेवींच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याप्रती निष्ठा भक्ती असणारे लोकं अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्ताने सहभागी होत असतात आणि त्याचं नियोजन आपण दरवर्षी राज्यस्तरावरती जयंती उत्सव समिती म्हणून करतो तसेेच स्थानिक पातळीवरची जयंती उत्सव समिती म्हणून करतो आणि सर्व राजकीय पक्षाच्या लोकांना, सर्व संघटनांच्या लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न असतो परंतु यावर्षी स्थानिक जयंती समितीची बैठक झाली नाही, कुठलीही राज्यस्तरीय समितीची बैठक झाली नाही.
31 मे रोजी चोंडीत महाप्रसादाचे आयोजन होणारच
प्रशासनावर दबाव आणि दडपशाही आणि सत्तेचा दुरुपयोग करीत राष्ट्रवादीने प्रशासनाला हाताशी धरून कोणालाही परवानगी दिली नाही. मी गेल्या अनेक वर्षांपासून चोंडीत जयंतीसाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करतो, त्या महाप्रसादाला देखील स्थानिक आमदारांनी आडकाठी आणली.आम्ही उभारलेला प्रसादाचा मंडप काढून टाकण्याचा प्रयत्न केला, तरीपण आपण तिथे प्रसादाची व्यवस्था करतोय असे राम शिंदे म्हणाले.
चोंडीत जयंती नसून राष्ट्रवादीचा मेळावा
कोणालाही विश्वासात न घेता चोंडीत जयंती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत, चोंंडीत साजरी होणारी जयंती नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे,चोंडीत ज्या मंडपाचे काम सुरू आहे त्यावर पूर्णता: राष्ट्रवादीचे फलक आणि झेंडे लावण्यात आले आहेत,अहिल्यादेवींची जयंती राष्ट्रवादी करतेय अशा पद्धतीचे चित्र आज चोंडीत पाहायला मिळत आहे असे सांगत शिंदे यांनी रोहित पवारांच्या कारभाराचे वाभाडे काढले.
शरद पवारांना स्वतःचा नातू मोठा करण्यामध्ये स्वारस्य
शिंदे पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीयांची अनास्था राहिलेली आहे, शरद पवार यांनी जेजुरीच्या जयंती उत्सवामध्ये माझे नातू रोहित पवार यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवींचा जन्म झाला असे ते म्हणाले होते, शरद पवारांना स्वतःचा नातू मोठा करण्यामध्ये स्वारस्य आहे. अहिल्यादेवींच्या जयंतीला अशा पद्धतीनं नामोल्लेख करणं गैर आहे.पवार साहेबांची पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संदर्भामध्ये काय त्यांच्या मनामध्ये आदर आहे हे यावरून आपल्याला निश्चितपणे स्पष्ट होत आहे असे सांगत शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
वाळू उत्खनन प्रकरणी सरकारने कारवाई करावी
भारतीय जैन संघटनेच्या माध्यमांतून चोंडीच्या सीना नदीच्या खोलीकरणाचे काम करण्यात आले परंतु आमदार रोहित पवारांचे बगलबच्चे आणि हस्तक यांनी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केलं आणि वाळू उत्खनन करून त्याची वाळु वाहुन नेण्यात आली, त्यामुळे तिथल्या तीर्थक्षेत्राला देखील धक्का पोचेल अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे त्या वाळू उत्खनन करणाऱ्यांवरती आणि विकणाऱ्यांवरती गौण खनिज मार्फत राज्य सरकारने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी शिंदे यांनी यावेळी केली.
कर्जत जामखेडमध्ये जमिनी हडपण्याचे उद्योग सुरू
चोंडी ग्रामपंचायतची जी 80 एकर जमीन आहे ती 80 एकर जमीन पवार साहेबांचे नातू आणि विद्यमान आमदार रोहित पवार यांनी स्थानिक संस्थेशी तडजोड करून आणि प्रशासनाला हाताशी धरून 80 एकर जमीन हडप केलेली असा सनसनाटी आरोप करत राम शिंदे पुढे म्हणाले की, मतदारसंघातील अनेक गावातल्या गायरान आणि ग्रामपंचायतीच्या जमिनी सर्रासपणे गावोगावी हडप करण्याचे काम रोहित पवार आमदार झाल्यापासून सुरू आहे. त्याचाच एक भाग चोंडीतील 80 एकर जमीन आमदारांनी हडपली असल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला.
कर्जत जामखेडमध्ये अडीच वर्षापासून इव्हेंटच सुरू
कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, कुकडीचे आवर्तन वेळेवर येत नाही, सीनाचं आवर्तन वेळेवर सुटलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळून चालली आहेत. फळबागा जळाल्या आहेत. त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचं आणि आता इव्हेंट करायचे फक्त अशा पद्धतीचं कर्जत जामखेडमध्ये गेल्या अडीच वर्षापासून काम सुुुरु आहे.
शेतात ऊस उभा.. तिकडे लक्ष न देता.. बैलगाडा शर्यतीचे आयोजन
मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात उभा आहे. तिकडे लक्ष द्यायला आमदाराला वेळ नाही, पण आता बैलगाड्यांची शर्यत केली. लोकांची पिकं जळतायेत, फळबागा जळतायेत याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही,अशा पद्धतीने इव्हेंट करणे आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे आणि हा पवार साहेबांच्या आधिपत्याखाली होतोय असे म्हणत शिंदे यांनी आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
The post खळबळजनक : राम शिंदे म्हणतात रोहित पवारांनी चोंडीतील 80 एकर जमीन हडपली Appeared first on Jamkhed Times