… म्हणून मोदी सरकारने इस्त्रायलच्या धर्तीवर अग्निपथ योजना आणली – आमदार राम शिंदे, राम शिंदे यांच्या पुढाकाराने आजी – माजी सैनिकांचा गौरव !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । दीडशे वर्षे पारतंत्र्यात असलेल्या आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी – ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली, स्वातंत्र्याचा लढा पुकारला अश्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करण्याबरोबरच देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचा जाज्वल्य अभिमान निर्माण करण्यासाठी देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातही हर घर झेंडा मोहिमला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा राम शिंदे यांनी केले.
देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आजी माजी सैनिकांना आमदार राम शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जामखेड तालुका भाजपच्या वतीने आज जामखेडमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार योगेश चंद्रे हे होते. आमदार राम शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आणि भाजपचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा बाईक रॅली नंतर जामखेड तालुका भाजपाच्या वतीने आजी – माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील 30 पेक्षाअधिक आजी – माजी सैनिकांचा यावेळी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर वीर नारी संगिताताई विठ्ठल घोलप यांचा यावेळी शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
राम शिंदेंच्या पुढाकारातून आजी – माजी सैनिकांचा सन्मान
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, सैनिकांचा सन्मान करणे हे देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांमुळे आपण सर्व देशवासीय सुखाने जगतो. सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी माजी सैनिकांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला असे शिंदे म्हणाले.
ध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या – राम शिंदे
गेल्या 75 वर्षांपासून तिरंगा झेंडा देशावरती डौलाने फडकत असल्यामुळे आपण सर्वजण स्वाभिमानाने आणि अभिमानाने जगत आहोत . देशभर हर घर झेंडा हा उपक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम पार पाडत असताना ध्वजाची संहिता पाळणे आवश्यक आहे. ध्वज लावताना कुठलाही अवमान होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असे अवाहन राम शिंदे यांनी यावेळी बोलताना केले.
प्रत्येक घरातला माणूस हा सैनिक असला पाहिजे – राम शिंदे
जेव्हा मी इस्त्रायलला गेलो होतो. तेव्हा तिथला प्रत्येक नागरिक सैन्यात दाखल होतो हे पाहिलं होतं. सध्या देशात अग्निपथ ही योजना मोदीजींनी सुरु केली आहे. इस्त्रायलच्या धर्तीवर अग्निपथ योजना केंद्र सरकारने आणली आहे. प्रत्येक घरातला माणूस हा सैनिक असला पाहिजे. वेळ, काळ, प्रसंग येईल त्यावेळेस देशाच्या संरक्षणासाठी लढला पाहिजे. याच दृष्टिकोनातून अग्निपथ ही योजना मोदी सरकारने आणली आहे.
अभिमान आणि स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी अग्निपथ योजना – राम शिंदे
जेव्हा आपल्यावर हल्ला होतो तेव्हा आपलं कुटूंब एक होतं, जेव्हा आपल्या गावावर हल्ला होतो तेव्हा संपूर्ण गाव एक होऊन लढतं, जेव्हा आपल्या तालुक्यावर कुठला हल्ला होत असेल सगळा तालूका लढतो, तश्याच पध्दतीने देशावर कुठलही संंकट आलं तर प्रत्येक नागरिक देशासाठी उभा राहिला पाहिजे आणि आपल्या देशाच्याप्रती आपला अभिमान आणि स्वाभिमान जागृत ठेवला पाहिजे, म्हणूनच अग्निपथ ही योजना हाती घेण्यात आली आहे, असे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
देशाच्या स्वाभिमानासाठी प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकला पाहिजे – राम शिंदे
वन रँक वन पेन्शन ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.सैनिकांप्रती आदर असल्यामुळेच ही योजना केंद्र सरकारने तत्काळ लागू केली असे सांगत राम शिंदे पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना कुठलाही पक्षीय, राजकीय, वैचारिक भेदभाव न बाळगता देशाच्या स्वाभिमानासाठी, अभिमानासाठी देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर तिरंगा झेंडा फडकला पाहिजे म्हणूनच भाजपने जामखेड शहरात आज तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते, असे शिंदे म्हणाले.
भाजपच्या तिरंगा बाईक रॅलीला जामखेडमध्ये जोरदार प्रतिसाद
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपच्या वतीने भव्य दिव्य तिरंगा बाईक रॅलीचे शनिवारी जामखेड शहरात आयोजन करण्यात आले. करमाळा चौक ते कर्जत रोड या मार्गावर ही तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. ही रॅली करमाळा चौक – मेनपेठ – बीड रोड – नागेश विद्यालय – मिलींद नगर – तपनेश्वर – खर्डा चौक – नगर रोड – कर्जत रोड या भागातून गेली. रॅलीचे शहरवासियांनी जोरदार स्वागत केले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, पंचायत समिती सदस्य डाॅ भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचरणे, मनोज कुलकर्णी, अमित चिंतामणी, सोमनाथ राळेभात, बाळासाहेब गोपाळघरे, प्रविण चोरडीया, तुषार पवार, मकरंद काशिद, ॲड बंकटराव बारवकर, उदय पवार, उध्दव हुलगुंडे सह आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीमुळे संपूर्ण शहराचे वातावरण तिरंगामय झाले होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, भगवान मुरूमकर, रविंद्र सुरवसे, शरद कार्ले, तहसीलदार योगेश चंद्रे सह आदींची भाषणे झाली.