पाऊसही रोखू शकला नाही शिंदे विखेंची तोफ : विखेंच्या साक्षीने राम शिंदेंनी गाजवला पाडवा !
भर पावसात रंगली राजकीय आतिषबाजी
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । डाॅ अफरोज पठाण | आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर चिखलफेक मनोरंजनाची साधने झाली आहे. सध्या न्युज चॅनेलवर राज्य सरकारमधील एक व्यक्ती खुर्चीवर बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणी किती गांजा मारला, कोण किती किमतीचा शर्ट घालतो, कोणी कधी किती सुट्या मारल्या, कोणाचे पायातील बुट किती रुपयांचे आहे, यासह कोणी आत कोणती चड्डी घालतय हे सांगण्याचे काम छान करतोय. यांना सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या प्रश्नाचे काही देणे घेणे नाही. अतिवृष्टीची एक रुपया देखील नुकसानभरपाई न मिळाल्याने राज्यासह अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यंदा काळी दिवाळी ठरली आहे. मात्र सुस्त सरकारला याचे काही देणंघेणं नाही असा घणाघाती आरोप खा सुजय विखे यांनी राज्य सरकारवर केला
कर्जत येथे माजीमंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार विखे बोलत होते. भरपावसात खा विखे आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी जोरदार बॅटिंग केली. भरपावसातील झालेल्या सभेत विखे शिंदे यांच्या राजकीय आतिषबाजीला उपस्थितांनी जोरदार साथ दिली.
आमचाही नंबर पावसाच्या सभेत
यावेळी पुढे बोलताना खा विखे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात पावसाची सभा निर्णायक ठरली होती. तशी आजची ही पावसाची सभा कर्जत नगरपंचायतीसाठी निर्णायक ठरेल असा आपला विश्वास आहे. आज या पावसात आपला नंबर लागला ते आपले भाग्य समजतो असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णायक सभेची आठवण उपस्थिताना करून दिली.
कर्जत – जामखेडमध्ये दबावाचे राजकारण
सध्या कर्जत- जामखेड मतदारसंघात व्यक्ती स्वातंत्र्यावर दबावतंत्र वापरून पक्षांतर करण्याचे काम चालू आहे. लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव टाकून स्वार्थ साधला जात आहे असा टोला नाव न घेता आ रोहित पवार यांना लगावला. यासाठी आगामी काळात व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहायचे असेल राम शिंदे यांच्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत आज फार बोलायचे होते मात्र वाढत्या पावसामुळे आपले भाषण आटोपते घेतो असे विखे म्हणाले.
…. म्हणून कळ काढा
यावेळी बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण शब्द पाळणारा माणूस आहे. मंत्रीपदाच्या काळात दिलेले शब्द विकासकामाच्या रूपाने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलला. विकासकामे करताना कधी दबावाचे अथवा खुनशीचे राजकारण केले नाही. आले त्यांचे काम करण्याचा इमानदारीने पुरेपूर प्रयत्नच केला. मागील दोन वर्षांपासून मतदारसंघातील लोकांना सांगता येईना, आणि बोलता पण येईना. आता आपल्याला पण काही करता येईना. आमदारांवर अविश्वास ठराव आणायचे हे लोकशाहीत नाही त्यामुळे आता आणखी दोन-तीन वर्षे कळ काढावीच लागणार आहे.
मग आम्ही काय करतोच की नाही ?
केंद्र सरकारने श्रीगोंदा-जामखेड, अहमदनगर-करमाळा महामार्ग मंजूर करून त्याचे काम हाती घेतले आहे. मात्र ते म्हणतात हे काम आम्हीच केले. मग आम्ही काय करतोच की नाही ? असा सवाल उपस्थित करत आम्ही केलेलं काम पण तुम्हीच केलं आणि तुम्ही कलेलं काम पण तुम्हीच असे म्हणत आ रोहित पवारांवर निशाणा साधला.
गोदड महाराजांनी आशिर्वाद दिला
सध्या मतदारसंघात लाईट वेळेवर येईना. आली तर मोटार चालू होईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आज संत सदगुरु गोदड महाराज यांनी खास कोट्यातून आशीर्वाद रुपी पाऊस उदघाटनप्रसंगी दिला. यामुळे यंदा ज्वारी चांगली होईल असा विश्वास व्यक्त केला.
राम शिंदेंनी दिले रोहित पवारांना खुले अव्हान
2019 च्या निवडणुकीत चमत्कार झाला. मलाही वाटलं एवढी विकासाची कामं केल्याच्या नंतर सुध्दा आपण जर हरत असु तर मी नंतर विचारलं की असं काय झालं ? मला तरूण पोरं सांगत होती की, या मतदारसंघाचा सर्वे झालाय 28 हजार मुलं बिगर लग्नाची आहेत, मला वाटलं मी हरल्या नंतर ते 28 हजार मुलांची लग्न करतील. दोन वर्षात किती पोरांची लग्न केली याचा खुलासा आमदारांनी केला पाहिजे असा जोरदार टोला लगावत शिंदे पुढे म्हणाले सात – आठ हजार सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा घेतला. पोरं काम मिळेल म्हणून खूश होती. यांचे आजोबा काका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत दोन वर्षात त्यांनी किती पोरांना नोकर्या लावल्या याचाही खुलासा करावा असे खुले अव्हान आमदार रोहित पवार यांना शिंदे यांनी यावेळी दिले.
खासदारांनी चान्स मारला, तर मी कसा सोडू – राम शिंदे
सभेस सुरुवात झाली त्यावेळी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे अनेक भाषणे रद्द करीत अध्यक्षीय भाषण म्हणून खा सुजय विखे यांना जिल्हाध्यक्ष मुंढे यांच्यानंतर संधी दिली गेली. खा विखे यांच्या भाषण सुरू असताना अचानक मोठ्या पावसास सुरुवात झाली. त्यामुळे विखेंना देखील काही महत्वाच्या मुद्यांना बगल देत भाषण आटोपते घ्यावे लागले. मात्र त्यांनतर स्वता राम शिंदे यांनी पुढे येत माईक ताब्यात घेत धडाकेबाज भाषण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. पराभवानंतर प्रथमच राम शिंदे यांनी जाहीर सभा घेतली असल्याने भर पावसात लोकांनी दोन्ही नेत्यांचे भाषण ऐकले हे विशेष.
विखेंच्या साक्षीने राम शिंदेंनी गाजवला पाडवा
भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावर विखे व शिंदे हे दोन्ही नेते स्फोटक भाष्य करतील अशी चर्चा होती. त्यामुळे सभेच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. मात्र पावसामुळे सर्वानाच भाषण आटोपते घ्यावे लागले. दोन्ही नेत्यांनी पक्षांतरावर कुठलेच भाष्य केले नाही.
भरपावसात उपस्थितांनी भाषणाचा आनंद घेतला. अधुन मधून उत्साही कार्यकर्ते घोषणा देऊन विखे शिंदेंचा उत्साह वाढवत होते. शेवटी पावसाचा जोर वाढल्यानंतर सभा संपली. परंतु त्यानंतर दोन्ही नेत्यांचा भेटण्यासाठी उपस्थितांची चढाओढ लागली होती. खर्या अर्थाने शिंदेंनी विखेंच्या साक्षीने पाडवा गाजवला अशीच चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, दादासाहेब सोनमाळी, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, अनिल गदादे, काळासाहेब धांडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर, अल्लाउद्दीन काझी, आरपीआयचे संजय भैलूमे, विजयकुमार तोरडमल, एकनाथ धोंडे, दत्ताआबा गोसावी भगवान मुरूमकर, किसान मोर्च्याचे सुनील यादव, विनोद दळवी, शहराध्यक्ष वैभव शहा, ज्ञानदेव लष्कर, गणेश पालवे, सुमित दळवी, पप्पू धोदाड, बापू शेळके, प्रवीण फलके, नगरसेवक तारक सय्यद, सोयब काझी, शेखर खरमरे, आफताब सय्यद, नंदलाल काळदाते, नगरसेविका राणी गदादे, नीता कचरे, राखी शहा, मंदा होले, मनीषा वडे, आशा वाघ, आश्विनी दळवी-गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री राम शिंदे यांचे संपूर्ण भाषण
First Publisher : jamkhedtimes.com
Web Title : sujay vikhenchyaa sakshine ram shindenni gajavala diwali padava Rain could not stop Shinde Vikhen’s cannon
वेब शिर्षक : पाऊसही रोखू शकला नाही शिंदे विखेंची तोफ; सुजय विखेंच्या साक्षीने राम शिंदेंनी गाजवला पाडवा