Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच राज्याच्या राजकीय पटावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. त्याच अनुषंगाने भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी दिल्लीमध्ये पार पडली. या बैठकीत 110 जागांवर चर्चा झाली.
भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली येथील मुख्यालयामध्ये केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक घेतली.सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीत महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय निवडणूक समिती सोबत 110 जागांवर चर्चा केली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 40 टक्के जागांवरील उमेदवार बदलले जाऊ शकतात. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने हा पॅटर्न वापरला होता. महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवला जाणार असल्याचे समजते, जे आमदार बरीच टर्म आहेत तसेच ज्या आमदारांविरोधात मतदारसंघात नाराजी आहे अश्यांचा पत्ता या निवडणुकीत कट होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप संघटक सरचिटणीस संतोष यांच्यासह राज्यातील भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, आशिष शेलार आणि पंकजा मुंडे उपस्थित होते.
भाजपची महाराष्ट्रातील पहिली यादी येत्या शुक्रवारी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या आजच्या बैठकीत 110 जागांवर शिक्कामोर्तब झालं आहे. उमेदवारांच्या नावाबाबत अंतिम निर्णय भाजपचे अध्यक्ष घेणार आहेत, तसंच पुन्हा दुसरी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवरांच्या राष्ट्रवादीसोबत चर्चा करूनच इतर जागांबाबत निर्णय घेतले जाणार आहेत, अशी माहितीही समोर आली आहे.