वाह रे पठ्ठ्या.. हेच आयकायचं व्हतं तीन वर्षाने आम्हाला.. म्हणत आमदार राम शिंदेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल ! वालवडच्या कार्यक्रमात आमदार राम शिंदे यांनी नेमकी काय भूमिका मांडली वाचा सविस्तर!
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। तीन वर्षे म्हणले परवानग्याच नाही, अशीच चालू केली, फलानचं झालं, आरं केली, असचं चालू केली, परवानग्या नसताना 40 टक्के काम पुर्ण झालं, लोकांना माहित व्हतं आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला माहित व्हतं, राम शिंदेय, काळजी करायचं कारण नाही, म्हणून योजनेचं 40% काम पुर्ण झालेलं होतं पण गेली तीन वर्षे जाणीवपूर्वक तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आमदार रोहित पवारांनी अन्याय केला. ठेकेदाराचं बील दिलं नाही, योजनेचं काम बंद ठेवलं, परवानग्या मिळू दिल्या नाही, पण आपलं सरकार आलं आणि एका फोनवर सगळ्या परवानग्या मिळवल्या, आता योजनेचं पाणी पडेपर्यंत काम बंद होणार नाही, निधीची काळजी करू नका, तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही, असे वचन आमदार प्रा राम शिंदे यांनी वालवड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले.
आमदार प्रा राम शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेली तुकाई उपसा सिंचन योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद ठेवण्यात आली होती, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला पुन्हा गती आली आहे. योजनेसाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. सोमवार दि 13 फेब्रुवारी 2023 रोजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील आणि आमदार प्रा राम शिंदे यांच्यासह लाभक्षेत्रातील नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कर्जत तालुक्यातील वालवड येथे या योजनेच्या कामास पुन्हा सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा राम शिंदे बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, तुकाई उपसा सिंचन योजना आपण सुरू केली आणि सहा महिन्याच्या काळातच ती जवळपास 40 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण केलं. अधीक्षक अभियंता काळे साहेब सांगत होते की ही योजना मंजूर करत असताना ती 61 कोटी रुपयांची होती आणि 61 कोटी रुपयांची असताना खासदार साहेब विचारत होते, हे कसं झालं ? तर ही जलसंधारण खात्यांतर्गत एकमेव राज्यातली योजना आहे. जलसंधारण खात्याचा मी मंत्री होण्याआधी अडीचशे हेक्टरच्या मर्यादेतच जलसंधारणाचं काम करता येत होतं, मी जलसंधारण मंत्री असताना विशेष प्रस्ताव मंत्रीगटासमोर आणला आणि 600 हेक्टरचे अधिकार जलसंधारण खात्याकडे घेतले. पाणीच शिल्लक नाही अशी ओरड व्हायची, त्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाणीवाटपाचा फेर प्रस्ताव सादर केला आणि त्यातून पाणी उपलब्ध केलं. त्यामुळे तुकाई उपसा सिंचन योजना मंजुर केली होती, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रतिष्ठा, मंत्रिपदाची प्रतिष्ठा पणाला लावली, पण..
तुकाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीनंतर कामाचा नारळही फोडला होता.पण ऐन निवडणुकीच्या काळात ही योजना टीकेचं लक्ष झाली, तुकाई योजना ज्या 19 गावांमधून जाते त्या गावांमधील एक गाव वगळता अन्य 18 गावांमध्ये मी 2019 च्या विधानसभेमध्ये मागे आहे. माझं सरकार पण गेलं, मी तुकाई चारी मंजुर करून देखील मला मतदान कमी पडलं, मग प्रश्न उपस्थित होतो, तुकाई उपसा सिंचन योजनेचं काम बंद का राहिलं ? काम यासाठी बंद राहिलं की कोणी म्हणायचं की ढेंगळ्याच्याच नळ्यात, कोण म्हणायचं सलाईनच्या नळ्यात. कोणी म्हणतं होतं असल्या फुकन्या असत्यात का ?, असं काय- काय म्हणून टीका करण्यात आली. पण ज्यांनी कामं केले, ज्यांनी सर्व राजकीय प्रतिष्ठा, मंत्रिपदाची प्रतिष्ठा पणाला लावली, वेळेत, कालमर्यादेत हे काम मंजूर केलं, त्याला काहीच आशिर्वाद, सहकार्य न देता अश्या पध्दतीचं काम केलं, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी खंत बोलून दाखवली.
वाह रे पठ्ठ्या.. हेच आयकायचं व्हतं तीन वर्षाने आम्हाला
यावेळी पुढे बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले की, आढळगाववरून जामखेडला जो रस्ता जातो तो वनविभागाच्या हद्दीतून जातो, मग तो रस्ता आगोदर सुरू झालाय का तुकाई योजना सुरू झालीय? मग त्याला मंजुरी मिळाली तर ह्याला मंजूरी का मिळाली नाही? तुकाई चारीमध्ये राजकारण आणि आडमुठेपणा घेऊ नये, महाराष्ट्रातली हा पथदर्शी एक नंबरचा प्रकल्पय असा मजकूर असलेली आमदार रोहित पवार यांची पोस्ट पाहिली, वाह रे पठ्ठ्या.. हेच आयकायचं व्हतं तीन वर्षाने आम्हाला.. मग तीन वर्षे योजना मार्गी लावायला अडचण काय होती? असा सवाल उपस्थित करत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांना चांगलेच फटकारले.
तीन वर्षांत तुमचं बागायत झालं असतं ना?
यावर्षी ओव्हर फ्लो चं 80 ते 85 दिवस पाणी चाललं, तुकाई योजना पुर्ण झाली असती तर यंदा सगळे तलाव ओव्हर फ्लो करून टाकले असते, गांगर्डे निमगावच्या धरणात गेल्या तीन वर्षांत पाणी आलं का? यावर्षी त्या धरणात पाणी गेलं का नाही, यावर्षी सगळ्यांना पाणी मिळालं, कधी नव्हे ते रूईगव्हाण, शिंदा, कोपर्डीला गेल्या दोन अडीच वर्षांत अडचण आली. तुम्ही मतं का दिली म्हणू म्हणू जिरवली तुमची..आमची तर जिरवून काढली तर काढलीच, तुमची काय जिरवायची राहिलीय का? तीन वर्षांत तुमचं बागायत झालं असतं ना? आमची जिरली, तुमची जिरली, आता तरी ध्यानात ठेवा, आपले आपलेच असतात असे आमदार राम शिंदे म्हणाले.
22 गावांचा प्रश्न सोडवल्याचं मला मानसिक समाधान
22 गावांचा प्रश्न सोडवल्याचं मला मानसिक समाधान आहे, मी अतिशय समाधानीय, पण मी बी काय कमी नाही, मागच्या दाराने आलोच , तुकाई चारीचा नाद मिटवायसाठीच आलोय, आल्याबरोबर तुकाई चारीला मंजुरी घेतलीच, एकाच फोन दिली मंजूरी, एकाच फोनवर, मी तर सत्ताधारी पक्षाचा मागच्या दाराचा आमदारय, तुम्ही सांगता ना आमचं सरकार व्हतं, मग ते विकास काम आडवायसाठी होतं का? त्यामुळं माणूस आपला तो आपलाच असतो हे ध्यानात ठेवा, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली.
बंद झाला का नाही तसला खेळ…
परत म्हणत्येत गडी मागच्या दाराने आलाय, त्याचं काय आयकायचं, गडी मागच्या दाराने जरी आला असला, काम पुढच्या दाराचं दाखिवत्योय आता,आपली सुध्दा कामं म्हणले आम्हीच आणली, आढळगाव ते जामखेड, अहमदनगर- सोलापुर 2 हजार कोटी आम्हीच आणलं, बोलाचाच भात अन बोलाचीच कढी, वाॅटसअप अन फेसबुक रेटून चलायचं, आता मी आमदार झाल्यापासून कोणाला व्हाईस काॅल आलाय का? बंद झाला का नाही तसला खेळ, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्ला चढवला.
अजून द्या बरं पत्र पाच एक हजार कोटी आणा…
तुम्ही केलंना सांगा ना, आम्ही केलयं आम्हीच सांगतोय, न्हावरा फाटा ते आढळगाव हा रस्ता पहिल्या फेजमध्ये झाला, त्यानंतर आढळगाव ते जामखेड हा 500 कोटींचा रस्ता झाला. अहमदनगर ते सोलापूर हा 2 हजार कोटीचा रस्ता मंजुर झाला, काय म्हणले आम्ही गडकरीला पत्र दिले की 2 हजार कोटी मंजुर झाले, अजून द्या बरं पत्र पाच एक हजार कोटी आणा, सकाळी आपलं बजेटला पत्र दिलेलं समजलरं समजलं लगेच वाॅटसअपला मेसेज सुरू केला आम्हीच आणलं आम्हीच आणलं, तुमच्या सरकारमध्ये तुम्हीच, आमच्या सरकारमध्ये पण तुम्हीच,आम्ही काय गोट्या खेळतो काय? असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
तुम्हीच सांगा आता..
तुकाई चारी आता नॉनस्टॉप करायची आहे, तीन वर्षे झाले ठेकेदाराला बील नाही, काळे साहेब म्हणतायेत ठेकेदार सक्षम आहे, पण आता काय लिलाव काढता का ठेकेदाराचा, बील आडवून धरलं, परवानग्या आडवून धरल्या,परत ते म्हणतात राज्यात एक नंबरचा पथदर्शी प्रकल्प आहे, याच्यात राजकारण आणि आडमुठेपणा कोणी करू नये, कोणी केलाय तुम्हीच सांगा आता, असा सवाल उपस्थित करत आमदार प्रा राम शिंदे यांनी रोहित पवारांचे चांगलेच वाभाडे काढले.
निधीची कसलीच अडचण येऊ देणार नाही
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना सोबत घेऊन जातो आणि कॅबिनेट बैठकीत तुकाई योजनेचा विषय मांडून बील द्यायची व्यवस्था करतो, पण माझी एकच विनंती आहे की, योजनेचं पाणी पडेपर्यंत कसलही काम थांबवायचं नाही, पंप हाऊस असो की वितरण व्यवस्था असो, काम बंद ठेवायचं नाही, तुकाई योजने बाबत तीन वर्षांपुर्वी आपण भूसंपादनाची नोटीस काढली होती, मात्र आजतागायत भूसंपादन नाही, ते तातडीने पुर्ण करा, पाणी बाहेर पडेपर्यंत काम सुरू ठेवा, निधीची कसलीच अडचण येऊ देणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही
तुकाई सिंचन योजना कसल्याही परिस्थितीत बंद होणार नाही, या योजनेचे काम सुरू असताना कोणाच्या शेतातून, बांधावरून जात असेल तर सहकार्य करा, ठेकेदाराला अधिकाऱ्याला सहकार्य करा, ही काय रिलायन्सवाल्याची पाईप लाईन नाही, त्यामुळं काहीही अपेक्षा करू नका, ही आपल्या पाण्याची योजना आहे, ही रिलायन्सची योजना नाही, त्यामुळं कोणीही काहीही आशाला लागू नका आणि काही मिळणारही नाही, आणि तुम्हाला सांगतो, तुकाईची शप्पथ घेऊन सांगतो, मी कुठंही कमी पडणार नाही, ही योजना कोणीही आडवू नका, हे काम आपल्याला पुर्ण करून दावायचयं, कोणी काहीही अफवा सोडीन, कोणी काहीही श्रेय घेईन, कोणाला काय श्रेय घ्यायचं ते घेऊ द्या, मी सहा वर्षाचा आमदार झालोय, योग्य वेळी योग्य काम दावणार आहे, त्याचं मला जजमेंट आलयं, मला सुध्दा सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात, त्यामुळं आपलं काम तुमच्यासाठी सुरूयं,त्यामुळं कोणीही आडवा आडवी करू नका, असे अवाहन यावेळी आमदार राम शिंदे यांनी केले.
योजनाच खोटी आली होती, त्या भपक्यात कार्यक्रम झाला.
आपल्याला काय पाकिस्तान आणि बांगला देशातून मतं आणायची नाही, आपल्यावर मोठं संकट आलं, पहिल्या निवडणुकीत साडे बेचाळीस हजार मतं पडले, दुसर्या निवडणुकीत 84 हजार मतं पडले, तिसऱ्या निवडणुकीत 93 हजार पडले, मतात कमी झाली नाही, तुम्ही पाडलं ही तुमची चुक मी समजत नाही. योजनाच खोटी आली होती, त्या भपक्यात कार्यक्रम झाला. लोकांना बर्याच आशा वाटल्या, ज्याला – त्याला, ज्याच्या त्याच्या कानात वेगवेगळं, योजना तुम्हाला चांगली कळाली आता, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी जोरदार टोलेबाजी केली.