“हाच का बारामती पॅटर्न, आमदार राम शिंदेंची तोफ पुन्हा धडाडली,रोहित पवारांना दिले ओपन चॅलेंज, ..तर मी 24 तासाच्या आत राजीनामा देणार – राम शिंदे”
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार राम शिंदे विरुद्ध आमदार रोहित पवार हा संघर्ष आता महाराष्ट्राला नवा राहिला नाही. या संघर्षात आरोप – प्रत्यारोपांची ठिणगी नेहमी पडत आहे. अश्यातच आता आमदार राम शिंदे हे रोहित पवारांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेत असल्याचे दिसत आहेत. मुंजेवाडी येथील कार्यक्रमातून रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर शिंदे यांची तोफ खर्डा शहरात धडाडली आहे. शिंदे यांनी आपल्या खास शैलीत रोहित पवारांच्या कारभाराची चिरफाड करत तुफान बॅटिंग केलीय. एकुणच आमदार राम शिंदे हे सध्या जोरदार फॉर्मात आल्याचे दिसत आहेत.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार राम शिंदे यांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचबरोबर आमदार रोहित पवारांचाही या कार्यक्रमातून त्यांनी जोरदार समाचार घेतला.याच भाषणाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
बारामतीचा प्रभारी नेमल्यावर…
यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, राजकारणामध्ये आम्ही कोणाचा विचार चालवतो, आम्ही कोणाचे पाईक आहोत,आम्ही कोणाचे कार्यकर्ते आहोत हे मॅटर करतं, मुंडे साहेबांनी आम्हाला कधीच चुकीचं शिकवलं नाही. आपल्यामध्ये जर कोणी आलं तर मुंडे साहेबांनी त्याला कधीच सोडलं नाही, म्हणून मी जाहीररित्या सांगितलं, मला ज्या वेळेस विधानपरिषदेचा आमदार झाल्यावर जेवढा आनंद झाला नाही तेवढा आनंद बारामतीचा प्रभारी नेमल्यावर झाला.
सख्खा आजोबाला कोणी नाव ठेवील का?
तसेेच शिंदे पुढे म्हणाले, आम्हाला मागच्या दारानी टोकलं तर जाहीर सांगितलं, तुम्ही आम्हाला मागच्या दाराने टोकता ना, आदरणीय पवार साहेब गेली 15 वर्ष झालं मागच्या दारानेच आहेत,ते रोज केंद्राला आणि राज्याला सल्ले देतात. ते तुमचे चुलत आजोबा असल्यामुळे तुम्ही असं बोलले का ? सख्खे आजोबा असल्यावर, सख्खा आजोबाला कोणी नाव ठेवील का? ते बी मागच्या दाराने, मी बी मागच्या दारानी, पवार साहेब आणि आम्ही बघू, त्यांनी दिला राजीनामा तर मीही राजीनामा देईन. माझं मागच्या दाराचं काढायचं, तुमचं मात्र झाकून ठेवायचं, हे कसं काय जमनं, असे म्हणत शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला.
आपण केलेला सत्कार परत घ्यायचाय…
ते जर तिकडून इकडे येतात, आपण तर तिकडे प्रचाराला चाललोय, एकदा निवडून आलेत, परत येण्याची शक्यता कमीय, आपण केलेला सत्कार परत घ्यायचाय, असे म्हणत शिंदे म्हणाले तसंही मी नशिबवान आहे आणि तुम्हीही नशिबवान आहात, अडीच वर्षाच्या पुढं आपल्याला वाट बघावी लागली नाही, मध्येच आमदार झालोय, नुसताच आमदार नाही झालो, ज्या दिवशी निवडून आलो त्यादिवशी आपलं सरकार आलं, आता 19 ला अधिवेशन आहे. त्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असे शिंदे म्हणाले.
आमदार राम शिंदेंचे रोहित पवारांना ओपन चॅलेंज
मी सहा वर्षाचा आमदार आहे, त्यांची आता दोन वर्षे राहिलीत, तुम्हाला जर एवढचं वाईट वाटलं असलं तर राजीनामा द्या, मी सुध्दा जनतेसमोर आणि मुंडे साहेबांना स्मरून सांगतो, त्यांनी जर आत्ता राजीनामा दिला आणि तो 24 तासांत मंजुर झाला, तर मी सुध्दा 24 तासाच्या आत राजीनामा देऊन उभा राहीन, आमदार म्हणून उभा राहणार नाही, तेही आत्ता, निवडणूकीच्या काळात नाही, त्याच कारणयं, मी राजीनामा देऊन निवडणूक लागत नाही, विधानसभेच्या आमदाराने राजीनामा दिल्याच्यानंतर निवडणूक लागते, त्यामुळे असलं चॅलेंज द्यायचं नाही, काय, हाय नाही ते थेट, मुंडे साहेबांच्या जयंतीदिवशी सांगतोय, इथं तिथं नाही, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा ओपन चॅलेंज देत टीकेचा बार उडवून दिला आहे.
हाच का बारामती पॅटर्न…
खर्ड्यात काहींनी अंदोलन केलं होतं, तेव्हा ते म्हणाले, राम शिंदे शेतकरी विरोधी आहे.अरे शेतकऱ्यांना विचारा, राम शिंदेंच्या काळात कधी ऊस जाळून तोडला का ? असा सवाल करत आता कारखान्यावाला आमदार निवडून दिलाय ना ? मग ऊस जाळून तोडला का नाही गेल्या सिझनमध्ये ? ही योजना आणली का तुम्ही, हाच बारामती पॅटर्न आहे का ? बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे, हा आमचा बारामती पॅटर्नय, ऊस बारा महिने पाणी देऊन उभा करावा,नाही कोणी माणसं मिळाली तर पदर पैश्याने तो जाळावा, टोळीवाल्याला अधिकचे पैसे द्यावेत, वाहनावाल्याला त्याच्यापेक्षा जास्त द्यावेत, खड्डा आणि झोला भरून मगच आमच्याकडे ट्रॅक्टर पाठवावेत असयं का ? असे म्हणत शिंदे यांनी ऊस गाळपात मागील वर्षी ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे झालेले हाल यावर भाष्य केले. आपल्या काळात झालं होतं का असं, तर नाही झालं, याकडे लक्ष वेधले. यंदा कोणाचं टीपरू राहून देणार नाही, हे बिगर कारखानावाला सांगतोय, असे म्हणत यंदा मतदारसंघातील ऊस गाळपात लक्ष घातले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
पाच दिवस आगोदर कारखाना कसा सुरू केला ?
मला म्हणले, कारखाना यांनी बंद केला, तुम्ही एखाद्याचं दुकान वीस मिनिटं ऊशिरा बंद झालं म्हणून त्यांचं लायसन्स रद्द केलं, तुमच्या कारखान्याला लायसन्स नसताना पाच दिवस आगोदर कारखाना कसा सुरू केला ? गेल्या वर्षी डिप्या उतरवल्या, आपल्या काळात असं कधी झालं नव्हतं, आता तेच अंदोलन करायला पुढे आलेत, असे म्हणत शिंदे यांनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.
तुमची योजना तुम्ही चालू करा.. आमची योजना आम्ही चालू करू..
जामखेड नगरपरिषद पाणी आणि मलनिस्सारण योजनेवरही आमदार राम शिंदे यांनी सडेतोड भाष्य केले. शिंदे बोलताना म्हणाले की, पुरावे कोणी मागितले का ? तुमची योजना तुम्ही चालू करा.. आमची योजना आम्ही चालू करू, तुमची योजना नारळ फोडूनही चालू का नाही, आम्ही काय म्हणलो का? की आम्ही आगोदर योजना आणली होती, आम्ही काय नाही म्हणलं, आता आम्ही योजना आणलीय, डबल शीट टाकू ना आम्ही, तुमची खालून टाकू तर आमची वरून टाकू, आम्ही म्हणलं उजनीवरून आणू, तुम्ही काय पैठणहून आणलीय का? तर नाही. सव्वा कोटी रूपये आम्ही भरले का नाय ? ठराव आम्ही घेतला का नाय? जलसंपदा खात्यात पाणी कोणी आरक्षित केलं? यांनी केलंय काय ? तर पोस्टमनकी केली. ठराव नेला प्रकरण आलं, प्रकरण गेलं प्रकरण आलं,असे म्हणत शिंदे यांनी पवारांचा चांगलाच समाचार घेतला.
मुख्यमंत्र्यांची सही आणि 250 कोटींचा निधी
शिंदे पुढे म्हणाले, पाच तासात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जामखेड पाणी योजना आणि मलनिस्सारण योजनेच्या मंजुरीचा शासन निर्णय आमच्या हातात दिला. ह्यांना वाटलं, सही तर झालीय, दोनेक महिने जातील मधी, तवर एक बातमी हाणून टाकू, तपासून सादर करा, पण हातात पत्र दिलं, सत्कार केला, साहेब म्हणले जातो, म्हणलं आत जाऊन पण सही करायचीय, बाहेर तरी सही करायची, बोलवाना फाईल इकडचं, लोकांच्या आणि मिडियासमोर मुख्यमंत्र्यांनी सही दिली आणि 250 कोटीला मंजुरी आणली असे शिंदे म्हणाले.
तीन वर्षे तुम्ही गोट्या खेळले, गोट्या सुध्दा नीट खेळले नाही…
कश्याला परवानग्या? काय परवानग्या ? दिलं ना आम्ही, तीन वर्षे तुम्ही गोट्या खेळले, गोट्या सुध्दा नीट खेळले नाही, रडी खेळले, हरायला लागले तर मी नाही म्हणले,असं नाही चालत, आम्ही मुंडे साहेबांचे कार्यकर्ते आहोत, त्या मुंगळ्यासारखं, अर्धा तुटला तरी चार पावलं चालतच राहिल, आम्ही चिवट आणि चिकाट कार्यकर्ते आहोत, असे सांगत शिंदे यांनी आपण अधिक आक्रमक डावपेच टाकणार असेच संकेत दिले.
15 वर्षांनंतर मुंडे साहेबांचा चेला मंत्री झाला आणि…
लोकांनी पण नमुना बघितला जरा भारी कामयं बघू कसं होतयं, आमची जिरवायला गेलं पण लोकांनी त्यांचीच जिरवून घेतली मला तरी काय करायचयं, झालं का नाही असं, कारण नसताना, घेणं नाही – देणं नाही, असे म्हणत शिंदे म्हणाले, विरोधक सांगत्येत आम्ही केलेल्या कामाची उद्घाटनं आम्हीच करू, आता सहा कोटीचा दवाखाना खर्ड्यात मंजूर केलाय, तो पुर्ण झालाय, तिथं कितीबाऱ्या येरझऱ्या घातल्यात, ते काम मंजूर करून कोणी आणलं होतं? पण उड्या कोण मारतयं? असं म्हणत शिंदेनी पवारांना जोरदार निशाणा साधला.
मुंडे साहेबांनी ज्या अमृतलिंग प्रकल्पाचा नारळ फोडला त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांंनी 15 वर्ष पैसे दिले नाहीत, निधी दिला नाही, 15 वर्षांनंतर मुंडे साहेबांचाच चेला मंत्री झाला आणि निधी उपलब्ध करून दिला.
मुंडे साहेबांच्या आठवणीत रमले राम शिंदे
भारतीय जनता पार्टीची ओळख केवळ आणि केवळ मुंडे साहेबांमुळेच महाराष्ट्रात मोठी झाली हे आपल्याला डावलता येणार नाही, त्यामुळे मुंडे साहेबांची कारकिर्द अतिशय महत्वाची झाली. एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीवर जर त्यांनी थाप मारली तर त्या कार्यकर्त्याचं कल्याण झालं, तो कार्यकर्ता वर्षभर काही शांत राहत नव्हता, माझ्या सारख्या कार्यकर्त्याला ग्रामपंचायतीला पडल्यावर आमदारकीचं तिकीट दिलं, एकदा आमदार झालो, दोनदा आमदार झालो, मंत्री झालो.
मुंडे साहेबांचा रात्री बाराला फोन आला आणि…
जर एखादा ग्रामपंचायतीला पडला तर त्याला पंचायत समितीचं तिकीट मी देऊ शकतो का ? कारण तुम्हीच म्हनताल आरं, त्यो ग्रामपंचायतीला पडला तर त्याला झेडपी आणि पंचायत समिती द्यायची कशी ? पण मला मुंडे साहेबांनी सांगितलं तिकीट तुलाच. रात्री बाराला फोन आला आणि सांगितलं, तुला तिकीटाला अडचण झाली, अनेक जण विरोधात आहेत. तुझं अवघड झालयं आता, म्हणलं काही नाही अवघड झालं साहेब, तु कसा निवडून येशील? हेव गेला, तेव गेला, त्योव विरोध करतोय, मी म्हणलं म्हणूनच मी निवडून येणारय, मंग म्हणले तु निवडून येणारयं ना नक्की? दिलं म्हणले तुला तिकीट, उद्या पाच वाजता प्रचाराचा नारळ फोडायला कर्जतमध्ये आलो.18 तासात प्रचाराची जुळवा जुळव केली आणि मुंडे साहेब कर्जतला नारळ फोडायला आले, एवढं प्रेम कधीही कोणाला मिळणे नाही. मुंडे साहेबांकडे कोणी फाटका तुटका कार्यकर्ता गेला तरी साहेब त्याला मदत करायचे.
भारतीय जनता पार्टी मुंडे साहेबांची जयंती आणि पुण्यतिथी करतेच कारण ते भारतीय जनता पार्टीचे नेते होते, पण विरोधकांना सुध्दा मुंडे साहेबांचं नाव घ्यावं लागतं, असे आमदार राम शिंदे म्हणाले.