Breaking News : इंडिया आघाडीतील दोन मोठ्या पक्षांनी दिला स्वबळाचा नारा, आघाडीत बिघाडीचे सुर, काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का !
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपविरोधात विरोधकांनी बनवलेल्या इंडिया आघाडीला बुधवारी जबरदस्त तडाखा बसला. इंडिया आघाडीतील दोन मोठ्या पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया आघाडीची एकजूट आता फुटीच्या उंबरठ्यावर आल्याने काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी पत्रकार परिषदे घेतली. यात त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये नमस्कार स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नंतर आम आदमी पक्षानेही स्वबळाचा नारा दिला आहे. पंजाबमध्ये आप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी बुधवारी स्पष्ट केले.पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढणार असे त्यांनी स्पष्ट केले. पंजाब आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात काँग्रेस सोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने आता इंडिया आघाडीत फुट पडल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालच्या सर्व जागांवर त्यांचा पक्ष एकटाच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस ही काँग्रेससोबत लढवणार नसून सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं आहे. बंगालमध्ये तृणमूलकडून काँग्रेसला केवळ 2 जागांचीच ऑफर देण्यात आली होती. यामुळे काँग्रेस नाराज होती. अखेर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि डाव्या पक्षांवर राग व्यक्त करत विरोधकांच्या INDIA मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बंगालमध्ये INDIA मध्ये पहिली फूट पडली आहे. तेथे विरोधकांची आघाडी ढेपाळली आहे.
आता उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबमध्ये काय होणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे. कारण येथील परिस्थितीही फारशी वेगळी नाही. येथे जागावाटपासंदर्भात एकमेकांना प्रस्ताव दिले गेले आहेत. मात्र अद्याप एकमत झालेले नाही. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडी यांच्यातच अद्याप लोकसभा जागावाटपासंदर्भात सहमती झालेली नाही. याशिवाय काँग्रेस आणि सीपीआय यांच्यातही पेच आहे. काँग्रेसकडून साधारणपणे अर्धा डझन जागा बिहारमध्ये मागत आहे. मात्र नितीश कुमार आणि लालू यादव काँग्रेसला एवढ्या जागा देण्यास अनुकूल नाहीत.
अशीच स्थिती उत्तर प्रदेशातही आहे. नुकतीच अखिलेश यादव यांच्यासोबत काँग्रेसच्या आघाडी समितीची बैठक झाली होती. या बैठकीत काँग्रेसने तब्बल 20 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते. त्यांनी 2009 चा फॉर्म्युला समोर ठेवत मध्य यूपीतील अधिकांश जागांवर दावा केला असून अखिलेश यादव यांच्याकडे 20 जागा मागितल्या आहेत. काँग्रेसच्या 20 जागांच्या प्रस्तावानंतर सपा देखील नाखूश आहे. भाजपासोबत थेट टक्कर घेतल्यास काँग्रेस कमकुवत होईल आणि त्यांच्यासाठी जागा काढणे अवघड होईल, असे सपाचे मत आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस सोबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं म्हटले आहे. बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू असे ही त्या म्हणाल्या. देशात काय होईल याची मला चिंता नाही पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत. बंगालमध्ये भाजपचा एकहाती पराभव करू. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आलेली नाही.
इंडिया आघाडीला एकाच दिवशी दोन मोठे झटके लागले आहेत. आप आणि तृणमूल काँग्रेस पक्षाने ज्यांची राज्यात सत्ता आहे त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता इतर राज्यांमध्ये काय होतं याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.