जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेेख । कर्जत – जामखेड मतदारसंघात सध्या अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. आमदार राम शिंदे मतदारसंघात कमालीचे सक्रीय झाले आहेत. तर आमदार रोहित पवार बॅकफूटवर ढकलले गेले आहेत. भाजपने इनकमिंग मोहिम गतीमान केली आहे. तर राष्ट्रवादीला गळती लागली आहे. यामुळे मतदारसंघाचे राजकारण भलतेच ढवळून निघाले आहे.अश्यातच कर्जतमधील काँग्रेसचे वजनदार नेते प्रविण घुले हे आमदार राम शिंदे यांच्या भेटीसाठी चोंडीत पोहचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आमदार राम शिंंदे आणि काँग्रेस नेते प्रविण घुले या दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. घुले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात आहे. परंतू त्याबाबत घुलेंकडून कसलेेच संकेत न मिळाल्याने ती चर्चा हवेतच विरली. मात्र प्रविण घुले यांनी शिंदे यांची 26 रोजी मध्यरात्री भेट घेतल्याने पुन्हा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
काँग्रेस नेते प्रविण घुले यांनी शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये रात्री उशिरा तब्बल दोन तास बंद दाराआड खलबते झाली. दोन्ही नेत्यांमध्ये विकास कामांसाठी की अगामी काळातील राजकारणासाठी भेट झाली याचा मात्र सविस्तर तपशील मिळू शकला नाही. मात्र, शिंदे-घुले यांची रात्री उशिरापर्यंत झालेली बैठक मतदारसंघात चर्चेत आली आहे. या भेटीमुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात काही तरी वेगळे घडणार याचीच चर्चा आता मतदारसंघात रंगली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात शिंदे विरुद्ध पवार हा वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही नेते ऐकमेकांविरोधात कुरघोडीची एकही संधी सोडत नाहीत.अश्यातच पवारांच्या गटात असलेल्या काँग्रेस नेते प्रविण घुलेंनी आमदार राम शिंदे यांची शनिवारी रात्री दहा ते बारा या वेळेत चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबते झाले असतील याचीच सर्वांना उत्सुकता आहे.
घुले हे सध्या आमदार रोहित पवार यांच्या गोटात आहे. घुले यांच्या गटाकडे कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्षपद आहे. घुले हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. तसेच माजी पंचायत समिती उपसभापती आहेत.कर्जतच्या राजकारणात प्रविण घुले हे मोठे राजकीय प्रस्थ आहेत. घुले हे आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत का ? म्हणून त्यांनी रात्री उशिरा आमदार राम शिंदे यांची भेट घेतली का ? या भेटीबाबत मतदारसंघात आता वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
शिंदे – घुले भेटीने मतदारसंघाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अगामी काळात कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होणार का ? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपात कोण कोणते बडे नेते प्रवेश जाणार याबाबत आता मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.