Big Breaking news | महाविकास आघाडीतील आणखी एका जेष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण, मंत्र्यांसह आमदार खासदार होऊ लागले कोरोनाबाधित
Big Breaking news | जामखेड टाईम्स वृत्तसेवा, दि,30 डिसेंबर 2021 | महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना ऐकामागोमाग कोरोनाची लागण होऊ लागल्याने राज्यात सरकारचे धाबे दणाणले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नंतर महाविकास आघाडीतील आणखी एका जेष्ठ मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्याची चिंता वाढवणारी बातमी गुरूवारी समोर आली. एकाच दिवसात ओमिक्रॉनचे 198 तर 5,368 नियमित कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने राज्याच्या चिंता वाढल्या आहेत. राज्यात मागील तीन चार दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यात पहिल्यांदा पाच हजार रूग्ण संख्येचा आकडा गुरूवारी पार केल्यामुळे राज्याचं टेन्शन वाढलं आहे.
राज्यातील राजकीय नेते सध्या कोरोनाबाधित येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहेत. राज्याच्या हिवाळी अधिवेशन कोरोनाचा शिरकाव झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून आमदार समीर मेघे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर गुरूवारी सायंकाळी आणखी एका जेष्ठ मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात हे गुरूवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती थोरात यांनी ट्विट करून दिली आहे. थोरात हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. यावेळी केलेल्या ट्विटमध्ये थोरात म्हणाले कि, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे सांगत आपण सर्वांनी मास्क वापरावा, काळजी घ्यावी असे अवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
दरम्यान राज्यात सध्या राजकीय नेत्यांच्या मुला मुलींचे विवाह सोहळे मोठ्या दणक्यात सुरू आहेत. या विवाह सोहळ्यात गर्दी होत आहे. कोरोना नियमांना धाब्यावर बसवले जात आहे. अश्यातच ज्या राजकीय नेत्यांच्या कुटूंबात हे विवाह सोहळे पार पडले त्यातील काही नेते आणि या सोहळ्यांना उपस्थित राहणारे काही नेते कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सुपर स्प्रेडर तर ठरणार नाही ना ?
बुधवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला होता. मोठ्या दणक्यात पार पडलेल्या या कार्यक्रमास महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिवराव लोखंडे, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार, राहीबाई पोपरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी या प्रमुख मान्यवरांसह जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या दुसर्या दिवशी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेला कार्यक्रम कोरोना सुपर स्प्रेडर तर ठरणार नाही ना ? अशी भीती आता जिल्ह्यातून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
राज्यातील कोरोनाची स्थिती काय ?
राज्यात गुरूवारी दिवसभरात एकुण 5 हजार 368 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत तर 1 हजार 193 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 22 कोरोनाबाधित रूग्णाचा आज राज्यात मृत्यू झाला आहे.
आज अखेर राज्यात 65 लाख 07 हजार 330 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचं रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के इतके आहे. राज्यात आज अखेर 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
ओमिक्रॉनचा विस्फोट
राज्यात ओमिक्रॉन रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे.राज्यात गुरूवारी ओमिक्रॉनचा अक्षरशा: विस्फोट झाला आहे. राज्यात एकाच दिवसातली सर्वोच्च रूग्ण संख्या नोंदवली गेली. तब्बल 198 ओमिक्रॉन रूग्ण गुरूवारी राज्यात आढळून आले आहेत.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (NIV) अहवालात तर 198 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 30 रूग्णांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. आज आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांमध्ये सर्वाधिक 190 रूग्ण एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. तर ठाणे मनपा 04, सातारा 01, नांदेड 01, पुणे मनपा 01, पिंपरी-चिंचवड 01 या नव्या रूग्णांचा समावेश आहे.
ओमिक्रॉन मृत्यूची नोंद
राज्यात आज एका ओमिक्रॉन रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात नायजेरियाहून प्रवासाचा इतिहास असलेल्या 52 वर्षाच्या पुरुषाचे 28 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या रूग्णास मागील 13 वर्षांपासून मधुमेहाचा त्रस्त होता. या रूग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणानी ( नाॅन कोविड मृत्यू) झालेला आहे. आजच्या अहवालात या रूग्णास ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झाले अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
राज्यातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या किती ?
राज्यात बुधवार अखेर 252 ओमिक्रॉन रूग्ण होते. गुरूवारी त्यात 198 रूग्णांची भर पडली. त्यानुसार राज्यात आजअखेर 450 कोरोनाबाधित रूग्ण झाले आहेत. यातील 125 रूग्णांच्या RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडून देण्यात आलेले आहे.
राज्यात आजवर आढळलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे
मुंबई 327 पिंपरी-चिंचवड 26, पुणे ग्रामीण 18, पुणे मनपा 12, ठाणे मनपा 12, नवी मुंबई 07, पनवेल 07, कल्याण डोंबिवली 07, नागपुर 06, सातारा 06, उस्मानाबाद 05, वसई विरार 03, औरंगाबाद 02, नांदेड 03, बुलढाणा 02, भिवंडी-निजामपूर मनपा 02, लातूर 01,अहमदनगर 01, अकोला 01, मिरा भाईंदर 01, कोल्हापूर 01 असे 450 ओमिक्रॉन रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. यात 09 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
राज्यात सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या किती ?
राज्यात गुरूवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 18 हजार 217 इतकी आहे. सर्वाधिक 11 हजार 360 सक्रीय रूग्ण मुंबईमध्ये आहेत. सर्वात कमी रूग्ण धुळे 4 रूग्ण नंदुरबार 4 रूग्ण, जळगाव 9 रूग्ण , हिंगोली 01 रूग्ण,
वाशिम 01 रूग्ण, वर्धा 04 रूग्ण, भंडारा 01 रूग्ण, चंद्रपुर 07 रूग्ण , गडचिरोलीत 08 रूग्ण आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात सक्रीय रूग्ण किती ?
अहमदनगर जिल्ह्यात गुरूवार अखेर सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 361 इतकी आहे.