देगलूर – बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपला चारली पराभवाची धुळ

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : संपुर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर झाला. काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवून भाजपचा दारूण पराभव केला. ऐन दिवाळीत समोर आलेला विजयी निकाल महाविकास आघाडीत उत्साह भरणारा ठरला आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली होती. या जागेवर काँग्रेसने दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवले होते. तर भाजपने शिवसेनेतून उमेदवार आयात करून उमेदवार रिंगणात उतरवला होता.

महाविकास आघाडीने पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवातून धडा घेत देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवलेली एकजूट महाविकास आघाडीला मोठे यश मिळवून देऊन गेली. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यासाठी ही अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. अखेर चव्हाण यांच्या मेहनतीला यश आले आणि जितेश अंतापुरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस आज सकाळी प्रारंभ झाला होता. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापुरकर आघाडीवर होते. ही आघाडी तोडण्यात भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना शेवटच्या फेरीपर्यंत यश आले नाही. काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांना शेवटच्या फेरीपर्यंत अखेर 01 लाख 08 हजार 840 इतके मते पडली तर भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली.

काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापुरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांना चारीमुंड्या चितपट करत ऐतिहासिक विजयी मिळवला. या निवडणुकीत अंतापुरकर हे तब्बल 35 हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले.