जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातील मोठा नेता पक्ष सोडणार आहे. आज सायंकाळी कर्जतमधील बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या राजकीय भुकंपामुळे पुन्हा एकदा आमदार रोहित पवार यांना जोर का झटका बसणार आहे. काँग्रेस नेत्याच्या भूमिकेमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या दहा दिवसांपासून पक्षांतराचे वारे सुसाट वाहू लागले आहे. जामखेड तालुक्यातील राजुरी आणि गिरवलीतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार आणि त्यांच्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीला वैतागून राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला होता. यामुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यातच आता काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पडले आहे.
काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दादा घुले यांनी गेल्या तीन दिवसांपूर्वी आमदार राम शिंदे यांची शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी भेट घेतली होती.ही बैठक मध्यरात्रीपर्यंत चालली होती. या बैठकीवर जामखेड टाइम्सने सचित्र वृत्त प्रकाशित करत मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत दिले होते. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण (दादा) घुले मित्र मंडळीची आज 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कर्जतमध्ये बैठक पार पडली या बैठकीत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या बैठकीत आंबीजळगावचे सरपंच विलास आप्पा निकत आणि काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रियेश सरोदे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याची भूमिका मांडत भाजपात प्रवेश करावा अशी आग्रही भूमिका मांडली. या भूमिकेला सर्व उपस्थितांनी हात उंचावून पाठिंबा दर्शवला. कार्यकर्त्यांच्या भूमिकेला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दादा घुले यांनीही होकार दिला.
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण दादा घुले आणि आमदार राम शिंदे हे गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात होते. घुले हे भाजपात जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर प्रविण घुलेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.