पंकजा मुंडेंनी नवा पक्ष काढल्यास महाराष्ट्रात राजकीय भूकंप, त्यांनी हिंमत दाखवावी, आम्ही त्यांच्यासोबत आहोत – इम्तियाज जलील
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्यापासुन भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मागील आठवड्याभरात पंकजा मुंडे समर्थकांनी वेगवेगळ्या माध्यमातून राज्यभरात आपली नाराजी व्यक्त केली. अशातच पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढावा (if Pankaja Munde forms a new party, political earthquake in Maharashtra) आणि आपली राजकीय ताकद दाखवून द्यावी असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (AIMIM MP Imtiyaz Jaleel) यांनी पंकजा मुंडेंना दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
यावेळी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, महाराष्ट्रात ओबीसी समाजाची लोकसंख्या मोठी आहे, परंतू ओबीसींना त्यांचा नेता नेमका कोण हेच माहित नाही. पंकजा यांनी जर ठरवलं तर वेगळा पक्ष काढू शकतात. पंकजा मुंंडे यांनी स्वता:ची ताकद ओळखायला हवी. पंकजा यांनी वेगळा पक्ष काढला तर त्यांच्या मागे मोठा समाज उभा राहू शकतो. यामुळे राज्यात मोठा भूकंप होईल, याचा सर्वाधिक फटका भाजपला बसेल असे सांगत जलील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
यावेेळी बोलताना भाजप पक्ष कुणामुळे मोठा आहे, हे सर्वांना माहीत आहे.देशात एकेकाळी या पक्षाचे दोन खासदार होते. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी देशात तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढवला. गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतीला एकनाथ खडसे होेेते.या दोघांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. एकनाथ खडसेंची आज काय अवस्था केली ते ठाऊकच आहे. तीच परिस्थिती आज पंकजा मुंडे यांच्यासोबत होतेय, हे उघड आहे. पंकजाचं दुर्दैव हे आहे की, तिला तिची ताकद कळून येत नाही
जलील पुढे बोलताना म्हणाले की, स्व गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी विधानपरिषद म्हणजे खूप छोटी गोष्ट आहे. त्यांनी आता मोठा निर्णय घेऊन आपली राजकीय ताकद दाखवण्याची गरज आहे. पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढून ओबीसी समाजाची ताकद उभी केली तर आम्हीही त्यांच्यासोबत जाऊ असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
भाजपने पंकजा मुंडे यांना स्पष्ट संदेश दिला आहे की खडसेंची जी अवस्था केली ती तुमची करू पण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी केलेले काम आजही समाज विसरलेला नाही. त्यामुळे तुमच्या पाठीमागे किती ताकत आहे एकदा समजात फिरवून पंकजा मुंडेंनी पाहायला हवं आणि धाडस दाखवायला हवं असेही यावेळी जलील यांनी स्पष्ट केले.