Karjat jamkhed News : कर्जत जामखेड मतदारसंघात माजी सभापती आशाताई शिंदे यांचा प्रचाराचा नवा पॅटर्न आला चर्चेत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख। कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा थेट सामना होणार आहे. निवडणूकपूर्व प्रचारात दोन्ही नेत्यांनी गावभेट दौरा राबवला आहे. यंदाच्या प्रचारात रोहित पवारांसाठी अख्खे कुटूंब, बारामती ॲग्रोची यंत्रणा तसेच पगारी नोकरदारांची बलाढ्य फौज मैदानात उतरली आहे. तर दुसरीकडे आमदार राम शिंदेंकडे लढाऊ नेते व कार्यकर्त्यांची फौज तसेच त्यांच्या पत्नी आशाताई शिंदे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आशाताई शिंदे ह्या शेतकरी वर्गाशी संवाद साधताना दिसत आहे. आशाताई शिंदे यांचा हाच प्रचाराचा नवा पॅटर्न मतदारसंघात चांगलाच चर्चेत आला आहे.
आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पत्नी तथा जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे हे गेल्या तीन महिन्यांपासून मतदारसंघातील जनतेशी संवाद साधत आहेत, त्यांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत.त्यांच्या दौर्यांना जनतेतून विशेषत: महिला वर्गातून प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.त्या दररोज आठ ते दहा गावांना भेटी देत आहे.सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत त्यांचा दौरा असतो. तब्बल १५ ते १६ तास त्या काम करताना दिसत आहेत. या दौऱ्यात त्यांना मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची खंबीर साथ मिळत आहे.
माजी सभापती आशाताई शिंदे ह्या आज जवळा जिल्हा परिषद गटातील गावांच्या दौर्यावर होत्या, त्यांनी आज सकाळी हळगावला भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध वस्त्यांना भेटी देत नागरिक व महिलांशी संवाद साधला. या दौऱ्यात कापसेवस्ती येथील दौरा आटोपून त्यांचा ताफा जवळ्याकडे जात असतानाच त्यांची नजर एका शेताकडे गेली. यावेळी त्यांना शेतात कांदा काढत असलेल्या महिला दिसल्या. हे पाहून लागलीच त्यांनी आपला ताफा थांबवला. त्यानंतर आशाताई शिंदे व त्यांच्या समवेत असलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट शेत गाठले.
यावेळी आशाताई शिंदे यांनी कांद्याच्या शेतातील बांधावर बसून उपस्थित महिला शेतकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. सरकारच्या विविध योजना, लाडकी बहिण योजना तसेच आमदार राम शिंदे केलेल्या विकास कामांची माहिती दिली. थेट मातीत बसुन, कोणताही बडेजाव न करता आशाताई शिंदे यांनी महिलांशी अतिशय आपुलकीने संवाद साधला.आशाताई शिंदे यांची नाळ मातीशी जुळलेली असल्याचे दर्शन यानिमित्ताने सर्वांना झाले. उपस्थित महिला शेतकरी यावेळी चांगल्याच भारावून गेल्या होत्या, आशाताई शिंदे यांनी प्रचारासाठी राबवलेला हा पॅटर्न मतदारसंघात चांगलाच चर्चेत आला आहे.
यावेळी भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष संजीवनीताई पाटील, माजी नगराध्यक्षा अर्चनाताई सोमनाथ राळेभात, अर्चनाताई संपत राळेभात, माया आव्हाड, दिपाली गर्जे व वर्षासाठ उबाळे या महिला पदाधिकारी माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या समवेत जोरदार प्रचार करताना दिसत आहेत.
“मंत्र्याची बायको असून पण बघ ना त्या कश्या बांधावर मातीवर बसून आपल्याशी किती प्रेमानं बोलत आहेत, कसला गर्व नाही, फुगीरपणा नाही, बघ आपली माणसं ही आपलीच असतात, परक्याचं काय खरयं, अशी कुजबूज यावेळी उपस्थित महिला शेतकऱ्यांमध्ये सुरु होती.”