Karjat Jamkhed News : कर्जत जामखेडमध्ये ‘आपला तो आपलाच’ या राजकीय स्लोगनने यंदा गाजवला बैलपोळा, राजकीय वारे फिरल्याचे स्पष्ट संकेत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा यंदाचा बैल पोळा सण लक्षवेधी ठरला आहे. कारण कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या ‘पार्सल नको भूमिपुत्र आमदार हवा’ अशी जनभावना तयार झाली आहे. याचेच प्रतिबिंब यंदाच्या बैल पोळा सणात उमटले.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा – राजाच्या अंगावर ‘आपला तो आपलाच’ हे राजकीय स्लोगन लिहीत भूमिपुत्र आमदार हवा हाच संदेश दिला. ‘बळीराजाचा इरादा पक्का..यंदा विधानसभेत आपला रामभाऊच पक्का’ अशीच गर्जना बळीराजाने केली आहे. यंदाचा बैलपोळा हा सण ‘आपला तो आपलाच’ या स्लोगनने कर्जत-जामखेड मतदारसंघात चांगलाच गाजवला आहे. (Karjat Jamkhed News)
2019 च्या विधानसभा निवडणुक काळात रोहित पवार ज्या पध्दतीने मतदारसंघातील जनतेशी आणि नेते व कार्यकर्त्यांशी वागले होते. त्यामुळे सर्वांनीच त्यांना डोक्यावर घेतले. परंतू गेल्या पाच वर्षांत त्यांनी दडपशाही, हुकुमशाही, एकाधिकारशाही, हम करे सो कायदा याप्रमाणे कारभार केला. यातून सर्वचजण दुखावले गेले. सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवारांविरोधात लाट निर्माण झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या मोठ्या नेत्यांनी रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते त्यांनी रोहित पवारांविरोधात उठाव करत उघड बंड पुकारले आहे.अनेकांनी त्यांची साथ सोडली आहे.(Karjat Jamkhed News)
तर दुसरीकडे मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले प्रा राम शिंदे यांनी गेल्या पाच वर्षांत जनतेशी सातत्याने संवाद ठेवला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ते पुन्हा आमदार झाले. पक्षाने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली. आमदार झाल्यापासून शिंदे यांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी करोडो रूपयांचा निधी आणला आहे. प्रा राम शिंदे हे आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील चित्रच बदलून गेले. कर्जत व जामखेड या दोन्ही बाजार समित्यांवर भाजप (महायुती) ची सत्ता आली. बहुतांश ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. अनेकांनी रोहित पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश केला.(Karjat Jamkhed News)
कार्यकर्त्यांना व नेत्यांना जपणारा, ताकद देणारा, आपला असो की परका सर्वांना मानसन्मान देणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा हक्काचा माणूस अशी आमदार प्रा.राम शिंदे यांची राज्याच्या राजकारणात ओळख आहे. आमदार शिंदे यांनी मंत्री असताना त्यापदाचा धाक दाखवून कधीच मतदारसंघात दडपशाहीचे, हुकुमशाहीचे राजकारण केले नाही, उलट विरोधी पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची अनेक कामे मार्गी लावली. कोणाचीच अडवणूक केली नाही. कोणी अडचणीत असेल तर त्यांची मदत केली. (Karjat Jamkhed latest News)
आमदार प्रा राम शिंदे यांचा कारभार आणि रोहित पवारांचा गेल्या पाच वर्षाचा कारभार याची तुलना आता होऊ लागली आहे. सर्वपक्षीय नेत्यांसह जनतेला आता कळून चुकले आहे की,आपला तो आपलाच असतो, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भूमिपुत्र आमदार हवा यासाठी स्थानिक नेते व कार्यकर्ते सरसावले आहेत. स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या या भूमिकेला जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे जनतेत सध्या आमदार प्रा राम शिंदे यांच्या नावाचाच बोलबाला वाढला आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वपूर्ण मानला जाणारा आणि बैलां प्रति कृतज्ञता म्हणून साजरा करण्यात येणारा बैलपोळा हा सण कर्जत-जामखेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा झालेल्या बैलपोळा सणात मतदारसंघात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब उमटताना दिसले. मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांच्या पाठीवर ‘आपला तो आपलाच’ हे राजकीय स्लोगन लिहून राजकीय वारे फिरल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. (Karjat Jamkhed latest News)