जामखेड ब्रेकिंग : कर्जत जामखेडच्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड, जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । रोहित पवारांच्या मनमानी व एकाधिकारशाही कारभाराविरोधात बंडाचा पहिला झेंडा राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात (Madhukar Ralebhat) यांनी फडकावला. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रा राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार ? याकडे मतदारसंघात लक्ष आहे. जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात हे येत्या काही दिवसांत भाजपामध्ये प्रवेश करू शकतात, अशी शक्यता खात्रीलायक सुत्रांनी वर्तवली आहे.

Jamkhed Breaking,  biggest political development in Karjat Jamkhed politics, possibility of senior leader Prof. Madhukar Ralebhat joining BJP?,

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांना आमदार करण्यासाठी ज्या नेत्यांनी जीवाचं रान केलं होतं, त्या नेत्यांमधील सर्वाधिक जनाधार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख तथा जामखेड तालुक्याचे जेष्ठ नेते  प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी आमदार रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून २५ ऑगस्ट रोजी पक्षाचा राजीनामा दिला होता.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर प्रा राळेभात हे कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचलेली होती. त्यातच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांनी जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी भाजपात यावे अशी खुली ऑफर फेसबुकवर पोस्ट लिहीत दिली होती. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला होता.

राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यापासून जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली होती. त्यातच २ सप्टेंबर रोजी प्रा मधुकर (आबा) राळेभात व आमदार प्रा.राम शिंदे या दोन्ही नेत्यांमध्ये रत्नापुर येथे बैठक पार पडली. या बैठकीत आमदार शिंदे यांनी प्रा राळेभात यांना भाजपात येण्याचे निमंत्रण दिले होते.

या बैठकीनंतर बोलताना प्रा राळेभात म्हणाले होते की, राष्ट्रवादी पक्ष सोडताना मी निर्णय घेतला होता की, आता यापुढे पुन्हा रोहित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं काम करणार नाही, मी मला तिकीट मागत आहे. मला जर तिकीट मिळाले तर उमेदवारी करणार, तिकीट नाही मिळाले तर मी रोहित पवारांच्या विरोधातील उमेदवाराला सर्वोतोपरी मदत करणार. आजही मी त्या मतावर ठाम आहे, असे सांगत सस्पेन्स वाढवला होता.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी आमदार प्रा.राम शिंदे यांच्यासमवेत जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात व काही ठराविक महत्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. मध्यरात्री झालेल्या या बैठकीत प्रा मधुकर (आबा) राळेभात यांचा भाजपातील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते. प्रा राळेभात हे येत्या २३ किंवा २४ सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करू शकतात, अशी खात्रीलायक माहिती समोर येत आहे. मात्र यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

जेष्ठ नेते प्रा मधुकर (आबा) राळेभात हे जामखेडच्या राजकारणातील महत्वाचे मोठे नेते आहेत. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सतत जनतेत रमणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या सारखा महत्वाचा जेष्ठ नेता भारतीय जनता पार्टीत आल्यास भाजपला याचा मोठा राजकीय फायदा होणार आहे. तर विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी आमदार रोहित पवारांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ लागल्याचे दिसू लागले आहे.