Karjat Jamkhed News: हळगाव साखर कारखान्याच्या कृषी अधिकाऱ्यावर मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी गुन्हा दाखल, नान्नजमधील सजग नागरिकांनी केला रोहित पवारांच्या धनशक्तीचा भांडाफोड !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच रोहित पवारांच्या हळगाव येथील जय श्रीराम शुगर ( बारामती ॲग्रो युनिट 3) मध्ये कार्यरत असलेल्या शेतकी अधिकाऱ्याला नान्नज येथे पैसे वाटप करताना सजग नागरिकांनी रंगेहाथ पकडण्याची घटना समोर आली. यावेळी या शेतकी अधिकाऱ्यांकडे रोख रक्कम व तीन चिठ्ठ्या आढळून आल्या. या चिठ्ठ्यांमध्ये राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नावाचा आणि रकमेचा समावेश असल्याचे समोर आले. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. नान्नजमधील सजग नागरिकांनी रोहित पवारांच्या धनशक्तीचा भांडाफोड करत राज्यात खळबळ उडवून दिली.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघात धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी लढत होत आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या महाशक्तीला पराभूत करण्यासाठी मतदारसंघातील गोरगरीब जनता एकवटल्याचे संपूर्ण प्रचार काळात दिसून आले होते. पराभवाच्या भितीने घाबरलेल्या रोहित पवार व त्यांच्या यंत्रणेकडून मतदानाच्या आदल्या दिवशी पैशांचा बेसुमार वापर केला जात असल्याची चर्चा रंगली होती.
अखेर मंगळवारी सायंकाळी रोहित पवारांच्या हळगाव येथील साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी मधुकर मोहिते यांना नान्नज येथे मतदारांना पैसे वाटप करताना सजग नागरिकांनी रंगेहाथ पकडले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मोहिते यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा मोहित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित पवार यांच्या साखर कारखान्याचा शेतकी अधिकारी मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना पैसे वाटप करताना पकडल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
फिर्यादीत नेमकं काय म्हटलयं ?
या प्रकरणी पोलिस काँस्टेबल आनंद दिलीप धनवडे यांनी जामखेड पोलिस स्टेशन दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आज दिनांक 19/11/2024 रोजी सकाळी 08/00 वा. ते सायंकाळी 20/00 वा. पावेतो विधानसभा सार्वत्रिक निवडणुक सन-2024 करीता फिरते सर्वेशन पथक टिम नं. 6 मध्ये मी, कृषी सहाय्यक- सागर दिलीप बोलभट, अर्जुन अमोल साठे (व्हिडीओ ग्राफर), व वाहन चालक लक्ष्मण ज्ञानोबा अंकुश असे आम्ही फिरते सर्वेशन पथकामध्ये कर्तव्यावर हजर होतो.
सायंकाळी -17/56 वा. चे सुमारास आम्ही बटेवाडी, खर्डा रोड, जामखेड ता. जामखेड येथे असताना फिरते सर्वेशन पथक प्रमुख सागर दिलीप बोलभट यांना नायब तहसिलदार मच्छिंद्र पाडळे यांनी फोन करुन सांगितले की, मौजे नान्नज येथे पैसे वाटप करत असलेबाबतची तक्रार प्राप्त झालेली आहे. तुम्ही सदर ठिकाणी तात्काळ जावुन खात्री करा असे सांगितले. त्यामुळे आम्ही फिरते सर्वेशन पथक लगलीच सरकारी वाहन नं. एम. एच.12 पी.सी. 7708 या वाहणाने नान्नज येथे गेलो असता आम्हाला नान्नज जवळके रोडलगत लोकांची गर्दी दिसली.
सदर वेळी त्याठिकाणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस पथक हजर होते. त्यावेळी आम्ही सदर ठिकाणी चौकशी केली असता तेथे जमलेल्या लोकांनी एका इसमास अडवुन ठेवलेले होते. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मधुकर मारुती मोहिते वय-50 वर्षे रा. पारेवाडी ता. करमाळा जि. सोलापुर असे सांगुन ते जय श्रीराम साखर कारखाना हळगाव येथे काम करीत आहे. सदरचा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो कंपनी लिमिटेडच्या मालकीचा आहे असे सांगितले.
त्यावेळी सदर ठिकाणी हजर असलेले शहाजी अंकुश गाडे, ओम चंद्रकांत मोरे, योगेश रमेश रजपुत, मंगेश प्रकाश काकडे, राज विकास पवार, रघुनाथ महादेव मोहळकर, महेंद्र अभिमान मोहळकर यांनी पकडुन ठेवलेला इसम मधुकर मारुती मोहिते हा उमेदवार रोहीत पवार यांना मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याचे सांगितले आहे.
त्यावेळी आम्ही सदर इसमाची दोन पंच व पोलीस यांचे समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे रोख रक्कम 32,000/- रुपये व एक पांढ-या रंगाचे पाकिट त्यामध्ये 10,000/- रुपये व दुसरे पांढ-या रंगाच्या पाकिटात 5,000/- रुपये असे एकुण 47,000/- रुपये मिळुन आले. तसेच लोकांची नावे असलेल्या तिन चिठ्या व दोन मोकळे पांढ-या रंगाचे लिफाफे असे मिळुन आल्याने ते पथक प्रमुख सागर बोलभट व मसपोनि. जाधव यांनी पंचनामा करुन पंचा समक्ष जप्त केली आहे.
मधुकर मारुती मोहिते वय-50 वर्षे रा. पारेवाडी ता. करमाळा जि. सोलापुर हा नान्नज येथे नान्नज जवळके रोडलगत लोकांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार रोहित पवार यांना मतदान करावे या उद्देशाने लोकांना पैसे वाटप करताना रोख रक्कम 47,000/- रुपये व चिठ्ठयासह मिळुन आला आहे. तसेच सदर इसम हा कर्जत जामखेड मतदार संघातील रहिवाशी व मतदार नसतानाही या मतदार संघात मिळुन आल्याने मा. जिल्हाधिकारी सो, अहिल्यानगर यांचेकडील क्र.डी.सी./विधानसभा निवडणुक/29/2024 अहिल्यानगर दिनांक 18/11/2024 रोजीचे आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून माझी मधुकर मारुती मोहिते वय-50 वर्षे रा. पारेवाडी ता. करमाळा जि. सोलापुर यांच्या विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. असे यात म्हटले आहे.
मधुकर मोहितेवर ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल
पोलिस काँस्टेबल आनंद दिलीप धनवडे यांच्या फिर्यादीवरून जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम शुगर ( बारामती ॲग्रो युनिट 3) मध्ये शेतकी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मधुकर मोहिते यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये कलम 173, 223 व लोकप्रतिनिधी अधिनियम 1950,1051, 1989 अन्वये कलम 123 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.
फिर्यादीत ‘त्या’ गाडीचा उल्लेख नाही
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे उमेदवार रोहित पवार यांना मतदान करावे या उद्देशाने लोकांना पैसे वाटप करताना हळगाव साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी मधुकर मोहिते यांना नान्नज येथे पकडण्यात आले. मोहिते हे चारचाकी वाहनातून नान्नज भागात पैसे वाटप करत फिरत होते. याचवेळी सजग नागरिकांनी त्यांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. ते ज्या चारचाकी वाहनातून फिरत होते त्या वाहनाचा उल्लेख जामखेड पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या फिर्यादीत करण्यात आलेला नाही, सदर गाडीचा उल्लेख का टाळण्यात आला ? याबाबत आता जनतेत उलटसुलट चर्चा रंगली आहे.