Sandhya Sonawane NCP : राक्षसी महत्वकांक्षा बाळगून मतदारसंघात आलेल्या परकीय शक्तीला गोरगरिबांची ताकद काय असते ते दाखवून द्या – संध्या सोनवणे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : “गेल्या पाच वर्षांत त्यांनी कधी कोणाला फोन केले नाही, कोणाला सन्मान दिला नाही, मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ते फोन करायला लागलेत, कार्यकर्त्यांना फोनवर ते काय काय बोलत आहेत हे जगजाहीर आहे.या मतदारसंघावर कोणाचीही मक्तेदारी नाही, त्यामुळे कोणीही दहशत माजवू नये, खरं तर दहशत माजवताना त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की, कर्जत जामखेडची स्वाभिमानी जनता आता तुम्हाला माघारी पाठवण्यासाठी सज्ज झाली आहे. मागच्या निवडणुकीत झालेली चुक यंदा होणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी रोहित पवारांवर हल्ला चढवला. त्या कर्जतमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होत्या.”
संध्या सोनवणे पुढे म्हणाल्या की, आमदार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री मतदारसंघातील येत आहेत, राज्यात महायुतीचे सरकार आणायचे आहे, केंद्रात आपली सत्ता असल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आणता येईल. भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा वाढला आहे. विरोधक गडबडून गेले आहेत. मतदान होईपर्यंत प्रत्येक रात्र वैर्याची असणार आहे, सर्वांनी सतर्क रहावे, विरोधकांच्या दडपशाही, गुंडगिरी व प्रलोभनांना बळी पडू नका, आपला स्वाभिमान आणि अभिमान गहाण राहणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीचे आयुष्य बरबाद होणार नाही याकरिता जागे रहा, सतर्क रहा, ही लढाई मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या अस्तित्वाची आहे. राक्षसी महत्वकांक्षा बाळगून मतदारसंघात आलेल्या परकीय शक्तीला आता घरचा दाखवण्यासाठी एकजूट व्हा आणि गोरगरिबांची ताकद काय असते हे धनदांडग्यांना दाखवून द्या, अशी साद यावेळी त्यांनी घातली.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते अपप्रचार करत आहेत, दमबाजी करत सुटले आहेत, रोहित पवार हे राज्यातील महिलांच्या विरोधात आहेत. त्यांचे पुरोगामित्व फक्त स्वता:च्या भाषणापुरतं आणि स्वता:चं नेतृत्व पुढं करण्यासाठीच आहे. महायुती सरकारने माझी लाडकी बहिण योजना आणली. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर महायुतीचे सरकार व आपले लाडके रामभाऊ चालत आलेले आहेत. महाविकास आघाडीवाले हेच खरे संविधान विरोधी आहेत. पुरोगामित्वपणाला कलंक लावणारी ही माणसं आहेत, महिला विरोधी आहेत. त्यांना या निवडणूकीच्या माध्यमांतून धडा शिकवायचा आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज रहा असे अवाहन संध्या सोनवणे यांनी केले.