एकनाथ खडसेंना जेलमध्ये जावेच लागेल, भाजप नेत्याच्या दाव्याने राष्ट्रवादीत उडाली मोठी खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : एकिकडे पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयाकडे खडसे संबंधी एका प्रकरणात पुन्हा तपास करण्याची परवानगी मागितली आहे.

भोसरी MIDC भूखंड प्रकरणाचे भूत पुन्हा एकदा  राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मानगुटीवर बसणार असल्याचे दिसत आहे.भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याबाबत महाविकास आघाडी सरकारच्या काळात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला हाेता. मात्र सरकार बदलताच या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयाकडे केली आहे. यावर 26 ऑगस्टला होणार आहे.

यावर भाजपा नेते गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.दोन वर्षांपासून ज्या केसेस सुरू आहे, ईडीची जी चौकशी सुरू आहे, भोसरी प्रकरणात जे प्रकरणात त्यांनी जे पराक्रम केले आहेत, ते सर्वांच्या समोर आहेत. त्यांचे जावई वर्षभरापासून तुरूंगात आहेत. त्यांना न्यायालय अजूनही जामीन का देत नाही. त्यात अनियमतता आहे, त्यामुळे एकनाथ खडसे हे भोसरी गैरव्यवहार प्रकरणात जेलमध्ये जातील, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचं महाजन म्हणाले.

बोगस कंपनीकडून त्यांनी पैसे फिरवले, साडेतीन कोटी आपल्या अकाऊंटमध्ये आणले, अर्धे मंदाकिनी वहिनी, जावयांच्या नावावर जमिनी घेतल्या. ३० कोटींची जमीन ३ कोटी रूपये दाखवले. अधिकारी विनाकारण तुरुंगात गेला. यांनी मंत्री असताना चुकीची कामं केली आहेत म्हणून ते ईडीच्या फेऱ्यात सापडलेत. सध्या न्यायालयाच्या नो कोर्स ऑफ अॅक्शनमुळेच ते तुरूंगात जात नाहीत. ते हटल्यानंतर यांनाही जावयासोबत जावं लागेल हे सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. हा आत टाकतोय तो टाकतोय याला अर्थ नाही. चौकशीला सामोरे जाऊन कागदपत्रं द्यावी,” असंही गिरीश महाजन म्हणाले.

माझा छळ करण्यासाठी सरकारने पाऊल उचलले

दरम्यान या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, येत्या काळात आपण सत्ताधाऱ्यांना जड जाऊ शकतो म्हणूनच माझ्या विरोधात मुद्दामहून जुनी प्रकरण उकरून काढण्यात येत आहे.भोसरी जमीन प्रकरणात मी निर्दोष मुक्त झालो होतो. मात्र मला फक्त त्रास द्यायला माझा छळ करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल आहे अशी प्रतिक्रिया एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भोसरी प्रकरणाबाबत अनेकदा चौकशी झाली आहे. झोटिंग समितीनेही चौकशी केली आहे. पुण्याच्या अँटी करप्शन विभागानं चौकशी करुन या प्रकरणात तथ्य नाही. हे प्रकरण बंद करण्यासाठी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिलाय. ईडीकडून आता या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मला नाउमेद करण्यासाठी हा चौकशीचा प्रकार सुरु आहे असे खडसे म्हणाले.

नाथाभाऊ हा राजकीयदृष्ट्या अडचणीचा असल्याने चौकशीची मागणी होते. नाथाभाऊ बाजूला झाला म्हणजे यांना रान मोकळं होईल. वारंवार छळण्याचा हा प्रकार आहे. या गोष्टीचा मी निषेध करतो. जनता हे सर्व पाहत आहे. भोसरी प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. मी 40 वर्षाच्या राजकीय जीवनात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाही. चुकीचं काम केलेलं नाही. भोसरी प्रकरणाची चौकशी कोणत्याही यंत्रणेने केली तरी काहीही तथ्य निघणार नाही, असा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय.