Raj Thackeray vs Sambhaji Brigade: संभाजी ब्रिगेडने कृष्णकुंजवर धाडले प्रबोधनकारांची पुस्तके !
राज ठाकरे विरूध्द संभाजी ब्रिगेड यांच्यातला वाद पोहचला शिगेला
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विरूध्द संभाजी ब्रिगेड (Raj Thackeray vs Sambhaji Brigade) यांच्यातला वाद आता चांगलाच शिगेला पोहचला आहे. राज ठाकरेंविरोधात आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडने बुधवारी राज ठाकरे यांना त्यांच्याच आजोबांनी (प्रबोधनकार ठाकरे) लिहिलेली पुस्तके वाचण्यासाठी कृष्णकुंजवर धाडली आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील जातीच्या राजकारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिला होता. तसेच राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर संभाजी ब्रिगेडनेही समाचार घेतला होता. त्यानंतर राज ठाकरे विरूध्द संभाजी ब्रिगेड असा सामना रंगला आहे. (Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीचा श्वास आहे. त्यांचे परखड लिखाण आणि प्रबोधनपर साहित्य महाराष्ट्राला नवी दिशा देणारा आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्यामुळे महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रबोधनाचा महाजागर निर्माण होऊ शकतो, एवढी ताकद त्यांच्या साहित्यात आहे. मात्र ठाकरे कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा राज ठाकरे यांनी ‘आजोबा’ प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचले नाही म्हणून ते चुकीच्या इतिहासकाराचे समर्थन करतात. त्यांनी वेळीच चूक दुरुस्त करून प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे याकरिता त्यांना संभाजी ब्रिगेडने पुस्तके पाठवली आहेत असे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले.(Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
महाराष्ट्राला प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख संभाजी ब्रिगेडने चांगल्या पद्धतीने करून दिली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्य पोहोचल्यामुळे समृद्ध तरुणांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी फार मोठी मदत झाली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या साहित्याची ओळख आम्हाला शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांमुळे झाली. आम्ही प्रबोधनकारांच्या रक्ताचे वारस नसलो तरी विचारांचे वारसदार नक्की आहोत. कारण संभाजी ब्रिगेडच्या चळवळीचा मूळ गाभा हे प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आहे. त्यामुळेच आम्ही परिवर्तनाची भाषा बोलतो आहोत. हीच भाषा त्यांचे रक्ताचे वारसदार विसरले आहेत हे फार मोठे दुर्दैव आहे. राज ठाकरे यांनी ही चूक तात्काळ दुरुस्त करावी अशी विनंती आहे असेही शिंदे म्हणाले. (Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
बाबासाहेब पुरंदरे हे खोटा इतिहास मांडणारे आणि चुकीच्या इतिहासाचा प्रचार करणारे तथाकथित इतिहासकार आहेत. ते जेम्स लेन समर्थक असून जिजाऊ-शिवरायांच्या बदनामीच्या प्रकरणात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. चुकीचा इतिहास मांडणाऱ्याचं समर्थन करणं हा शिवद्रोह आहे. राज ठाकरे यांनी ‘आजोबा’ प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण साहित्य वाचावे म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे संपूर्ण पुस्तक रूपात साहित्य ‘कुरियर’ पाठवण्यात आले आहे. ते संपूर्ण साहित्य राज ठाकरे यांनी वाचावे व कार्यकर्त्यांनाही वाचायला द्यावे असे अवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे.(Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे, खडकवासला विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील रायकर, सोनू कुंजीर आदी उपस्थित होते.
तुम्ही प्रबोधनकारांचे नातू की पुरंदरेंचे ? – संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडने राज साहेब तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंचे नातूआहात की पुरंदरेंचे? असा थेट सवाल विचारल्याने मनसे व संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद आता वेगळ्या वळणावर आला आहे. संभाजी ब्रिगेडचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी १८ ऑगस्ट रोजी यासंदर्भात एक प्रसिध्दी पत्रक काढत राज ठाकरेंना थेट सवाल केला आहे. Raj Thackeray vs Sambhaji Brigade
गुजरात व नागपुरच्या मालकाला खूश करण्यासाठी
महाराष्ट्रात आगामी निवडणुकीमध्ये मनसेला भाजप सोबत युती करायची असल्याने गुजरातच्या व नागपूरच्या मालकाला खूश करण्याचे धंदे राज ठाकरे यांच्याकडून सुरू आहेत असा टोला संभाजी ब्रिगेडने लगावला आहे. (Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
आम्हाला खळखट्याक शिकवू नका : संभाजी ब्रिगेड
आम्हीच भांडारकर, वाघ्या, दादोजी कोंडदेव, सुदर्शनला फोडले, गडकरीचा पुतळा जमीनदोस्त केला होता त्यामुळे संभाजी ब्रिगेडला खळखट्याक शिकवायची गरज नाही असाही इशारा प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.
कोणतेही असंवेदनशील विधान कराल तर याद राखा
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब व प्रवीण दादा गायकवाड हे बहूजन मराठा समाजाचे मार्गदर्शक व दिशादर्शक आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये कोणतेही असंवेदनशील विधान यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा इशारा अहमदनगर मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, अवधूत पवार, पोपटराव चेमटे, कैलास वागस्कर, नवनाथ मोरे, माणिकराव वागस्कर, प्रताप शिंदे, सागर जाधव, राजूभाऊ लोटके आदींनी दिला आहे.
मनसे विरूद्ध संभाजी ब्रिगेड वादात महाविकास आघाडी अडकली
फडणवीस सरकारने पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्या पुरस्काराला देशभरातील साहित्यीक अभ्यासक, दोन्ही छत्रपती तसेच प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी, शिवप्रेमींनी, अनेक संघटनांनी विरोध केला होता. तरीही फडणवीस सरकारने खुर्चीचा व सत्तेच्या बळाचा वापर करत पुरस्कार दिला त्यामुळे पुरस्काराची किमंत कमी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला असुन महाविकास आघाडी सरकारने पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्यावा’, अशीही मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीमुळे मनसे विरूद्ध संभाजी ब्रिगेड वादात महाविकास आघाडी अलगद अडकली आहे. या वादात महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Raj Thackeray vs Sambhaji Brigade)
आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष
संभाजी ब्रिगेडच्या या सर्व आरोपांवर आणि प्रश्नांवर राज ठाकरे, त्यांचे नेते काय प्रत्युत्तर देणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
वाद नेमका कश्यामुळे ?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाती व्यवस्थेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, ते पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करत आहेत. असा आरोप करत राज ठाकरेंवर तोफ डागली होती. त्यानंतर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनीही राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती. त्यानंतर चवताळलेल्या मनसेकडून गायकवाड व कोकाटे यांच्याविरोधात गरळ ओकत टीकास्त्र सोडले होते. यावर आक्रमक झालेल्या संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांच्यावर आक्रमक टिका करण्याचा धडाका लावला आहे. यामुळे संभाजी बिग्रेड विरुद्ध मनसे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray vs Sambhaji Brigade)