Ajit Pawar Latest News : अजित पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, सोशल मिडीया अकाउंटवरील त्या कृतीने सस्पेन्स वाढला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Ajit Pawar Latest News : राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड होणार अशी चर्चा रंगली आहे, यामध्ये राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा राष्ट्रवादीचे वजनदार नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. त्यातच अजित पवार यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर झालेली एक कृती सध्या या सर्व चर्चांना दुजोरा देणारी ठरू लागली आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपामध्ये प्रवेश करणार किंवा राष्ट्रवादीमधील मोठा गट सोबत घेवून भाजपासोबत युती करणार अशी चर्चा गेल्या आठवडाभरापासून सुरू असतानाच अजित पवार यांनी आज आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील राष्ट्रवादीचा प्रोफाईल फोटो हटवला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या सोशल मीडियावर अन बातम्यांच्या केंद्रस्थानी अजित पवार आहेत. दरम्यान अजित पवार यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी घडलेल्या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे, त्यामुळे अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललयं ? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे.
अजित पवार यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील ४० आमदार पवार यांच्या सोबत असून, भाजपासोबत जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी चर्चा शिगेला पोहोचली आहे. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ”असे काहीही आमच्या मनात नाही. ही सर्व चर्चा केवळ मीडियामध्ये घडवून आणली जात आहे.” असा दावा करण्यात आला.
दरम्यान, अजित पवार यांनी फेसबुक आणि ट्टिवटर या दोन्ही अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नावाचा उल्लेख असलेला प्रोफाईल फोटो काढून टाकला आहे. त्यामुळे बंडखोरी आणि राजकीय उलथापालथ बाबत सस्पेन्स आणखी वाढला आहे. अजित पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यात ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अजित पवार हे विधानभवनात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी त्यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याविषयी चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. असे असले तरी अजित पवारांच्या भूमिकेनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.