वातावरण तापलं : रोहित पवारांचे आमदार राम शिंदेंना खुले आव्हान – ‘त्या’ प्रत्येक कामांची उच्चस्तरीय चौकशी करा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विरूद्ध भाजपचे आमदार राम शिंदे हा संघर्ष शिगेला पोहचला आहे.आमदार राम शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
शेतकऱ्यांची बाजू घेतल्यानंतर जर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जात असेल आणि लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी माध्यमांना दिली आहे.
मी कोरोना संकट, लम्पी, दुष्काळ, अतिवृष्टी या काळात जे काम केले आहे, त्या प्रत्येक कामाची त्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी. लोकांची मदत केली म्हणून कारवाई होणार असेल तर बिनधास्त करावी असे खुले आव्हानच आमदार रोहित पवार यांनी आमदार राम शिंदेंना दिले.
राज्यात स्वता:चे सरकार आल्यानंतर विरोधकांवर दबाव आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटत असाल तर जाताना शेतकरी आणि विद्यार्थ्यांचेही प्रश्न मांडा असा सल्ला आमदार पवार यांनी आमदार राम शिंदे यांना दिला.
आमदार रोहित पवार विरूद्ध आमदार राम शिंदे हा संघर्ष अधिकच वाढत चाललाय. दोन्ही नेते शह कटशहाचे राजकारण जोरात करत आहेत. दोन्ही नेते आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. आमदार रोहित पवारांनी दिलेल्या खुल्या आव्हानावर आमदार राम शिंदे काय बोलणार याकडे राज्यासह मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
पवार विरूद्ध शिंदे या राजकीय लढाईची खमंग चर्चा दिवाळीच्या तोंडावर अधिकच उठून दिसू लागली आहे. यातून यंदाच्या दिवाळीत कर्जत-जामखेडमधील जनतेला राजकीय फराळाची मोठी मेजवानी मिळणार असेच दिसत आहे.