जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर विखे समर्थक अशी ओळख असलेल्या सहकार महर्षी जगन्नाथ राळेभात यांच्या दोन्ही मुलांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राळेभात बंधूंनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने खासदार सुजय विखे पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी बेरजेचे राजकारण मोठ्या वेगात हाती घेतले आहे. भाजपातील अनेक बड्या नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी त्यांनी मोठी मोहीम राबवली आहे. कर्जतमध्ये भाजपाचे नेते नामदेव (देवा) राऊत व त्यांच्या समर्थकांना काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर जामखेड तालुक्यातून कोणता बडा नेता राष्ट्रवादीत जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
तत्पूर्वी जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. आता पुढचा नंबर कुणाचा ? ही उत्सुकता सर्वांनाच होती. त्यानुसार राष्ट्रवादीची चाचपणी सुरूच होती. अखेर शनिवारी राष्ट्रवादीने मोठी खेळी करत भाजपला भगदाड पाडले. जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात या दोन बड्या नेत्यांनी पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राळेभात बंधू राष्ट्रवादीत यावेत यासाठी आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक नेत्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न केले होते. अखेर राष्ट्रवादीला राळेभात बंधूंना राष्ट्रवादीत आणण्यात यश आले. शनिवारी पुण्यातील साखर संकुलात हा प्रवेश सोहळा पार पडला. राळेभात बंधूंसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जामखेडचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सभापती सूर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, प्रशांत शिंदे सह आदी पदाधिकारी उपस्थित होते.