DCM Ajit Pawar : मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार ? अजित पवारांना अर्थ गृह की अन्य ? पहा संभाव्य यादी
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 04 जूलै 2023 : सत्तेच्या राजकारणात शरद पवार विरूध्द अजित पवार या नव्या सत्तासंघर्षाचा बाँब रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात फुटला. यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली.भाजपा शिवसेना युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या एक गट सहभागी झाल्याने खातेवाटपाची पुर्नरचना करावी लागणार आहे.
राज्य सरकारमध्ये आजवर अजितदादा पवार यांनी जलसंपदा व अर्थ ही महत्वाची खाती संभाळली आहेत. आता अजित पवार भाजपा शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. राज्याचे सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री बनण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांना कोणते खाते मिळणार याची उत्सुकता अजितदादांच्या समर्थकांना आहे.
सध्या सुरु असलेल्या चर्चांवरून अजितदादांना अर्थ किंवा गृह हे महत्वाची खाती मिळू शकतात, अशी पवार समर्थकांमध्ये चर्चा आहे. परंतू आता नव्या 9 मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.
टिव्ही 9 च्या वृत्तानुसार, अजित पवार यांच्या गटातील 9 मंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. या यादीत अजित पवार यांना महसुल, दिलीप वळसे पाटील यांना सांस्कृतिक व कृषि, हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्याक व कामगार, छगन भूजबळ यांना ओबीसी आणि बहूजन, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय असे खातेवाटप होणार असल्याची संभाव्य यादी समोर आली आहे.
रविवारी शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भूजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. नव्या मंत्र्यांना कोणते खाते मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील वजनदार नेते आहे. विरोधीपक्ष नेते असताना त्यांनी थेट सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्यानंतरचे महत्वाचे तिसऱ्या क्रमांकाचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे,परंतू आता सरकारमध्ये अजित पवारांची एन्ट्री झाल्याने अजित पवार हे तिसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते असणार आहेत. त्यामुळे आता राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सरकारमधील महत्व आपसूकच कमी होऊ शकते. खातेवाटपात महसुल खाते विखे-पाटलांकडून काढून अजितदादांकडे जाणार असल्याने विखे समर्थकही अस्वस्थ आहेत.
दरम्यान, मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत कृषिमंत्री राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. हे पद सध्या शिवसेनेच्या अब्दूल सत्तार यांच्याकडे आहे. कृषिमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील विराजमान होणार असल्याचे बोलले जात आहे, यामुळे शिवसेनेच्या गोटातही अस्वस्थता आहे.