चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल – अजित पवार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीला अवघे काही तास उरले आहेत, यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.सर्वच उमेदवारांकडून मतांची जुळवाजुळव करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. (Maharashtra will see on Monday who the miracle is happening to – Ajit Pawar)

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये राज्यसभेची पुनरावृत्ती होणार का? की महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाआणि महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून येतील, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित दादा पवार म्हणाले की चमत्कार कुणाबाबत घडतोय हे 20 तारखेला उभा महाराष्ट्र बघेल. मागील दोन दिवसांपासून मी बातम्या बघतोय, परंतु मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही महा विकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय.

पवार पुढे म्हणाले की, चमत्कार होईल की आणखीन काय होईल, ते सगळं दिसेलच,11 पैकी दहा जण निवडून येणार आहेत, तर एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे चमत्कार घडणारच, आता हा चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहिल.

महा विकास आघाडी सहा जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. जो 26 चा आकडा गाठायला कमी पडतील त्यांची तर विकेट जाणारच आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यसभा निवडणुकीत जे घडलं ते घडू नये, यासाठी महाविकास आघाडी आपल्या उमेदवारांचा कोटा वाढण्यासाठी प्रयत्न करत आहे. कुठल्याही आमदाराचे मत बाद होऊ नये यासाठी आम्ही सतर्क आहोत,असेही पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अपक्षांना सन्मानाने मते मागितली पाहिजेत, मी व महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी अपक्षांशी संपर्क केला आहे असेही पवार यांनी सांगितले.