MLA Rohit Pawar be included in cabinet? | कर्जत – जामखेडला तिसर्यांदा मिळणार लाल दिवा ? राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
MLA Rohit Pawar be included in cabinet? | जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख | कर्जत जामखेड मतदारसंघाला तिसऱ्यांदा लाल दिवा मिळू शकतो अशी जोरदार राजकीय चर्चा आता राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या हालचाली महाविकास आघाडीकडून सुरू आहेत. काँग्रेसच्या कोट्यातून सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत असतानाच आता कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा रंगली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आमदार रोहित पवार यांची थेट कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिकामी आहे. त्या जागेवर रोहित पवार यांची वर्णी लागु शकते असे बोलले जात आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व असावे यासाठी रोहित पवारांचा मंत्रिमंडळात समावेश करून राष्ट्रवादीकडून पालकमंत्रीपद देण्याचाही घाट घातला जात असल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वीच कर्जत – जामखेड मतदारसंघाला दोनदा लाल दिवा मिळालेला आहे. यापूर्वी स्वर्गिय आबासाहेब निंबाळकर यांनी मंत्रिमंडळात काम केले. त्यानंतर लाल दिव्याने तब्बल 15 ते 20 वर्षे हुलकावणी दिल्यानंतर राम शिंदे यांच्या रूपाने मागील पाच वर्षे मतदारसंघाला दुसऱ्यांदा लाल दिवा मिळाला होता. आता आमदार रोहित पवार यांच्या रूपाने मतदारसंघाला तिसऱ्यांदा लाल दिवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेली चर्चा जर खरी ठरली तर आमदार रोहित पवार यांचा मंत्रिमंडळात होणाऱ्या समावेशाने कर्जत जामखेड मतदारसंघाला लाल दिवा मिळेल. त्या माध्यमांतून मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष भरून निघण्यास मदत होईल.
दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो ही बातमी मतदारसंघात धडकताच राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला आहे. मात्र जोवर राष्ट्रवादी अथवा स्वता: रोहित पवार याबाबत थेट भूमिका मांडत नाहीत तोवर ही राजकीय चर्चाच ठरणार आहे हे मात्र निश्चित!