जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आयोध्या दौर्यावर जाण्याआधीच शरद पवारांचे नातू तथा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे आयोध्येत दाखल होणार आहेत. रोहित पवारांच्या अचानक आयोध्या दौर्याने राज्याच्या राजकारणात मात्र खळबळ उडवून दिली आहे.
आमदार रोहित पवार सध्या कुटुंबासह चारदिवशी धार्मिक तिर्थयात्रेवर आहेत. त्यांच्यासोबत आई सुनंदा पवार व वडील राजेंद्र पवार आहेत. त्यानुसार पवार कुटुंब देशभरातील सर्वधर्मीय तिर्थस्थळांना भेटी देऊन दर्शन घेत आहे. अश्यातच रोहित पवार यांनी शुक्रवारी आयोध्येत जाणार असल्याची फेसबुक पोस्ट केल्याने पवारांच्या धार्मिक तिर्थयात्रेची चर्चा राज्यात होऊ लागली आहे.
येत्या काही दिवसांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही आयोध्येला जाणार आहेत. ठाकरे यांच्या आयोध्या दौर्याआधी मनसेकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. अश्यातच शरद पवारांचे नातू तथा आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब आयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या ते आयोध्येत धडकणार आहेत.
राज ठाकरे यांच्या आधीच रोहित पवार आयोध्येत धडकणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवारांकडून मनसेला दे धक्का देण्याची खेळी तर खेळली गेली नाही ना ? अशी नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उद्या दुपारी 12 च्या सुमारास रोहित पवार आयोध्येत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते रामलल्लाचं दर्शन घेतील अशी माहिती समोर येत आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या चार दिवशी धार्मिक तिर्थयात्रेविषयी फेसबुक दोन स्वतंत्र पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, आपली संस्कृती ही धार्मिक आणि अध्यात्मिकतेच्या पायावर उभी आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या विचारांनी प्रेरीत असणारी संस्कृती देशाला आणि जगाला महान बनवत असते. देशातील विविध जाती-धर्माची माणसं अध्यात्माच्या विचारांनी एकत्रित बांधली गेली आहेत.
या अध्यात्माशी निगडीत अनेक प्राचीन धार्मिक स्थळं राजस्थानमध्ये आहेत. त्यामध्ये धार्मिक कुंड, प्राचीन मंदिरं, मंडप यांचा समावेश आहे. संपूर्ण देशभरातून भाविक आणि पर्यटक इथं दर्शनासाठी येत असतात. यापैकी एक महत्त्वाचं मंदिर म्हणून राधा गोविंद मंदिराकडं पाहिलं जातं. तिर्थयात्रेच्या दुसऱ्या दिवशी राजस्थानमध्ये गेल्यानंतर सुरवातीला राधागोविंद मंदिराला भेट दिली.
अत्यंत आकर्षक आणि भव्य असं हे राधा गोविंद मंदिर आहे. देशभरातून असंख्य भाविक इथं दर्शनासाठी येत असतात. जयपूरमध्ये सिटी पॅलेस परिसरातील सूरज महालात महाराज जयसिंह द्वितिय यांनी भगवान श्रीकृष्णाच्या वंशजांनी तयार करुन घेतलेल्या राधा गोविंद यांच्या मूर्ती वृंदावनातून बैलगाडीमधून जयपूरला आणल्या आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा केल्याचं सांगितलं जातं.
इथं प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अनेक धार्मिक संप्रदाय आणि भक्तीची पीठंही या भागात तयार झाली. राधा गोविंद मंदिरासोबतच राधा दामोदर आणि गोपीनाथजी यांचीही मंदिरं इथं आहेत. त्यामुळं एकूणच या परिसरात अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींचा आणि भाविकांचा वावर वाढला आणि या परिसरालाही वृंदावनासारखं रुप आलं.
आम्ही दर्शनाला गेलो असताना या मंदिराचे जे पहिले पुजारी होते त्यांच्या २८ व्या वंशजांची भेट झाली. तेही इथं पुजारी म्हणून सेवा करतात. राधा गोविंदाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी व्यक्तिशः संपूर्ण मंदिर परीसरात फिरवून इथलं ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्त्व काय, याची तपशीलवार माहिती दिली. ही रंजक माहिती ऐकताना अनेक तास कसे निघून गेले, हे आम्हाला कळलंही नाही.
आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एक कुशल राजनितिज्ञ म्हणून श्रीकृष्णाकडं पहावं लागेल. महाभारतात त्यांनी जी भूमिका पार पाडली आणि असत्यावर मात करुन सत्याच्या विजयासाठी जे डावपेच आखले त्याला तोड नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र समजून घ्यायला मला आवडतं आणि श्रीकृष्णाच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याचा माझा प्रयत्न असतो. या मंदिराला भेट देऊन दर्शन घेताना आत्मिक आनंद मिळालाच पण आपल्या अध्यात्मिक इतिहासाची ओळख झाल्याने हा आनंद द्विगुणीत झाला…
राधा गोविंद मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पुष्करच्या ब्रम्ह मंदिराला भेट दिली. आपल्या पुराणकथांमध्ये ब्रम्हांडाच्या निर्मितीचं श्रेय ब्रम्हदेवाला दिलं आहे. पण या ब्रम्हांडाचं सृजन करणाऱ्या ब्रम्हदेवाची देशात फारशी मंदिरंही नाहीत आणि तुलनेनं त्यांची पूजाही तुरळक ठिकाणी केली जाते. राजस्थानमधील पुष्कर येथील ब्रम्ह मंदिर हे ब्रम्ह देवाच्या अत्यंत मोजक्या मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर महर्षी विश्वामित्रांनी बनवल्याचं सांगितलं जातं. पुढं आदि शंकराचार्यांनी या मंदिराची डागडुजी केली. दरवर्षी कार्तिकी पोर्णिमेला इथं महापूजा केली जाते. इथंच ब्रम्ह देवाच्या दोन पत्नी – सावित्री आणि गायत्री यांचीही मंदिरं आहेत.
ब्रम्ह मंदिराच्या बाजूला आप्तेश्वर मंदिर आहे. या मंदिरात शिवलिंग असून, इथं भगवान शंकराची पूजा केली जाते. इथला तलाव आणि हे मंदिर हिंदू धर्मात जगातील सर्वात पवित्र तिर्थक्षेत्रांपैकी एक असल्याचं मानलं जातं. या परिसरात येऊन ब्रम्हदेवाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि पवित्र तलावालाही भेट दिली. तलावातील संथ, निळंशार आणि नितळ पाणी पाहून तर या ठिकाणाहून हलण्याचीही इच्छा होत नव्हती. इथं येऊन सृष्टीच्या सृजनकर्त्याबद्दल एक प्रकारचा आदर आणि कृतज्ञतेने मन भारावून गेलं. दर्शनानंतर या भारावलेल्या वातावरणातून निघताना मात्र पावलं जड झाली होती.
पुष्करला ब्रम्हदेवाचं दर्शन झाल्यानंतर महान सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर येथील दर्गा गाठला. महंमद पैगंबरांचे वंशज असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना ख्वाजा गरीब नवाज म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्या या पवित्र दर्ग्यात वर्षभर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेष म्हणजे केवळ मुस्लिमच नाही तर सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान आणि देशातील राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक म्हणून या दर्ग्याकडं पाहिलं जातं. त्यामुळं मुस्लिमांशिवाय अन्य धर्मिय लोकही या दर्ग्याला भेट देऊन ख्वाजा साहेबांवर चादर चढवून, माथा टेकून मनःशांतीचा अनुभव घेतात.
हजरत मोईनुद्दीन चिश्ती यांचा जन्म इराणचा. तिथं काही वर्षे वास्तव्य केल्यानंतर भारतात येऊन त्यांनी ईश्वरभक्तीत स्वतःला वाहून घेतलं. लोकांच्या सुखासाठी ते अल्लाकडं प्रार्थना करत. मानवसेवा हाच ख्वाजासाहेबांचा धर्म होता.हा दर्गा वास्तुकलेलचाही एक उत्तम नमुना आहे. इराणी भारतीय वास्तूकलेचा संगम याच्या बांधणीत दिसतो. दर्ग्याचं प्रवेशद्वार आणि घुमट अतिशय सुंदर आहे. याचा काही भाग बादशाह अकबर आणि शहाजहानने बांधला होता. दर्ग्याच्या आत अतिशय सुंदर नक्षी असणारा चांदीचा पिंजरा आहे. त्यात ख्वाजा साहेबांची मजार आहे. हा पिंजरा जयपूरचे महाराजा जयसिंह यांनी बनवला होता.
दर्ग्यात मैफिलीसाठीची खास खोलीसुद्धा आहे. दर्ग्याच्या आजूबाजूलाही अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. दर्ग्याच्या समोरच भले मोठे पातेले असून ते बादशाह अकबर आणि जहांगीरने दिल्याचं सांगितलं जातं. तेंव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून भात केला जातो आणि गरीबांना वाटला जातो.
त्याप्रमाणे आम्हालाही तांदूळ आणि इतर साहित्य त्या पातेल्यात टाकण्याचं भाग्य मिळालं. इथल्या उरूसाची सुरवात ख्वाजासाहेबांच्या मजारवर हिंदू कुटुंबाद्वारे चादर चढवूनच होते, हे आणखी एक वैशिष्ट्य आहे.या पवित्र दर्गात दर्शन घेऊन देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी दर्ग्याच्या विश्वस्तांनी दर्ग्याची प्रतिमा भेट दिली.
आज देशात आणि राज्यात काही घटकांकडून धार्मिक दुही निर्माण करुन कलुषित वातावरण निर्माण केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अजमेर दर्ग्यात सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या सर्वधर्मिय लोकांना श्रद्धेने माथा टेकवताना पाहून आपल्या महान संस्कृतीचा मनोमन अभिमान वाटतो.शेकडो वर्षांपासून धार्मिक सहिष्णूता, मानवतावाद, प्रेम आणि बंधूभाव याचा प्रत्यय इथं येतो.
राजकीय फायद्यासाठी कुणी कितीही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या मनात जोपर्यंत सर्वधर्मसमभावाची, प्रेमाची, बंधुभावाची ज्योत पेटलेली आहे तोपर्यंत जात-धर्माच्या नावाने त्यांच्या मनात कोणीही विष कालवू शकत नाही, याची मनोमन खात्री इथं पटते.
तिसऱ्या दिवशी सकाळी राजस्थानमधील मेहन्दीपूरच्या बालाजी मंदिराला भेट दिली. मेहंदीपूर बालाजी हे हनुमानाच्या भक्तांचं एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. देशाच्या काही भागात हनुमानजींना बालाजी नावाने ओळखलं जातं. या मंदिरात श्री बालाजी महाराज हे बाल हनुमान विराजमान झाले आहेत.
शिवाय श्री प्रेतराज सरकार आणि श्री कोतवाल भैरवनाथ या देवांचंही इथं दर्शन घेता येतं. बालाजीच्या मूर्तीसमोर मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र आणि सीतेची मूर्ती बघायला मिळते. बालाजी महाराजांच्या डाव्या बाजूने छातीखालून एक बारीक प्रवाह सतत वाहत असतो, हे एक रहस्य आहे. देशभरातून अनेक भाविक बालाजीच्या दर्शनासाठी या ठिकाणी वर्षभर येत असतात.
बालाजी महाराज हे भगवान शिवाचा अवतार असून त्यांना लाडू अर्पण केले जातात. भैरव कोतवाल हे बालाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती आणि भगवान शिवाचे अवतार आहेत. म्हणूनच त्यांना कोतवाल (कॅप्टन) असं म्हणतात. त्यांना उडदाच्या डाळीपासून बनवलेले पदार्थ आणि जिलेबी आवडते. प्रेतराज सरकार हे बालाजी महाराजांच्या दरबारात शिक्षा करणारे आहेत. दुष्ट आत्म्यांना शिक्षा करण्याचा अधिकार त्यांनाच आहे. त्यांना शिजवलेला भात आणि खीर आवडत असल्याची माहिती इथं मिळाली.
या मंदिरामध्ये कोणालाही प्रसाद खाता येत नाही आणि इतरांनाही देता येत नाही. शिवाय घरीही प्रसाद घेऊन जाण्यास परवानगी नाही. अशा प्रकारे अनेक वैशिष्ट्य असलेल्या मेहन्दीपूरच्या बालाजी महाराजांचं दर्शन घेऊन आणि या स्थळाचं अध्यात्मिक व पौराणिक महात्म जाणून घेऊन प्रसन्न अंतःकरणाने आम्ही पुढील प्रवासासाठी उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झालो.
आमदार रोहित पवार हे सहकुटुंब उद्या उत्तर प्रदेशमध्ये असणार आहेत. उद्या दिवसभरात ते आयोध्येसह अन्य कुठल्या कुठल्या धार्मिक ठिकाणांना भेटी देणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.