आमदार रोहित पवारांची फेसबुक लाईव्ह संवादातून तरुणाईला भावनिक साद, ‘त्या’ मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या – रोहित पवार
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांचा येत्या 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. गेल्या दहा दिवसांपासून मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी आज सायंकाळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून संंवाद साधत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पवार यांनी सात मिनिटे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. विशेषत: या संवादात तरूणाईला भावनिक साद घातली, या संवादात आमदार रोहित पवार नेमकं काय म्हणालेत, पाहुयात !
नमस्कार, मी आमदार रोहित पवार, मी राजकीय व सामाजिक जीवनामध्ये यायच्या अगोदर माझा वाढदिवस कधी आला आणि कधी गेलाय हे मला कळत पण नसायचं, वाढदिवसाच्या निमित्ताने माझी आई, माझे वडील, माझी बहीण मित्रपरिवार, फोन करायचे तेवढा माझा वाढदिवस, पण राजकीय जीवनामध्ये आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, वाढदिवसादिवशी तर शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक इतके फोन करता की कधी कधी फोन सुद्धा लागत नाही, हे जे तुमचं प्रेम आहे ना, तीच खरी माझी ताकद, तीच माझी प्रेरणा आहे.
तुम्ही सर्वजण मला भेटता, मोठे मोठे फुलाचे गुच्छ घेऊन येतात, मोठे मोठे पोस्टर लावतात, तुम्ही या शुभेच्छा देत असताना मला या शुभेच्छा खुप आवडतात, तुम्हाला भेटायला आवडतं पण मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो की, तुम्ही दिलेला तो गुच्छ माझ्या ऑफिसमध्ये मी ठेवल्यानंतर त्याचं काय होतं? असा विचार केल्यानंतर गेल्या वर्षी आपल्या सर्वांना विनंती केली होती की, माझ्या वाढदिवसानिमित्त हा खर्च करण्यापेक्षा जर आपण हाच खर्च काही सामाजिक कारणासाठी केला तर काय होईल ? ज्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद शाळा किंवा गव्हर्नमेंट शाळेमध्ये खाऊ वाटप असेल, पुस्तक वाटप असेल, कुठल्याही व्यक्तीला मदत असेल मी म्हणत नाही हजारोंच्या संख्येत करा एका व्यक्तीला जरी आपण मदत केली ना ती फार मोठे गोष्ट आहे !
मी सुद्धा मतदारसंघांमध्ये शाळेमध्ये जेव्हा मुलांना सामाजिक हितातून मदत करतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारं हास्य ही खरी माझी ताकद आहे. सामाजिक हितातून छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त केल्या तर ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. रक्तदान शिबिर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात झालं,काही आकडे सांगायचे झाले तर पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले. तीस हजार वह्या गेल्या वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गेल्या. त्यांच्यासाठी तर ती खूप मोठी गोष्ट आहे.माझ्या वाढदिवसानिमित्त वही वाटप असेल, रक्तदान मोठ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता,रक्तदानातून जेव्हा एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळत असेल तर केवढी मोठी गोष्ट आहे.
जेव्हा तुम्ही अशा काही गोष्टी करतात तेव्हा काही छोट्याशा पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत.
- “तुम्ही ज्या गावांमध्ये राहता, शहरांमध्ये राहतात, आसपास परिसरामध्ये राहता, तिथे तुमची बहीण, तुमची मैत्री, तुमच्या आसपास असणाऱ्या ज्या मुली आहेत त्या जेव्हा शाळेला नाहीतर कॉलेजला जातात, तेेव्हा काही मुलं उगाचच त्या ठिकाणी त्यांना त्रास देतात, मोटरसायकलवर बसतात, आवाज करतात पण त्या मुलींच्या प्रोटेक्शनची जबाबदारी आपण घ्यावी, मी एकदम म्हणतोय असं नाही अनेक तुमचे काही मित्रपरिवार असेल तर त्यांनी ती घ्यावी ही विनंती तुम्हाला या ठिकाणी मला करायची आहे.”
अनेेक सरकारी योजना असतात त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही मग आपल्या आसपास राहणाऱ्या एखाद्या गरजूला सरकारची कुठलीही योजना त्याला कशी पोहोचेल यासाठी प्रयत्न करावे. वृक्षारोपण आपण करू शकता, त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियामध्ये चांगले असाल तर मग एखादी चांगली सामाजिक गोष्ट हजारो लोकांपर्यंत कशी आपल्याला पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करा.
आपल्याला संस्कृती जपायची आहे, परंपरा जपायची आहे, त्यासाठी किल्ल्याची स्पर्धा आपल्याला घेता येईल का ? वक्तृत्व वक्तृत्व स्पर्धा घेता येईल का? काहीही करा पण सामाजिक करा.मला विश्वास आहे की, अशाच पद्धतीने माझा वाढदिवस तुम्ही सर्वजण त्याठिकाणी साजरा कराल.
माझा वाढदिवस ज्या पध्दतीने तुम्ही साजरा करतात तशाच पद्धतीने तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करा, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा सुद्धा तुम्ही असाच साजरा केला तर किती मोठा बदल होईल आणि हे बदल करून आणण्याची ताकद तुमच्यात आणि माझ्यात आहे.आपल्या सर्वांमध्ये आहे.
- तुम्ही आहात म्हणून मी आहे.मी तुमच्यातलाच एक आहे. राजकीय जीवनामध्ये आपल्या पिढीसाठी काहीतरी करता यावं,आपल्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी करता यावं म्हणून मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.थोडीशी स्टाईल वेगळी आहे, पण त्या स्टाईलला तुम्ही प्रतिसाद दिला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण मला फॉलो करता कधी चुकलो तर टीकाही करता. ते मी स्वीकारतोय,पण तुम्ही आणि मी एक आहोत, आपण युवा पिढी आहोत, त्यामुळे नवी दिशा देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो की, वाढदिवस तर अजून यायचं पण तुम्ही मला वाढदिवसानिमित्त गेल्या दहा दिवसांमध्ये हजारो फोन केले, शुभेच्छा दिल्या, त्या शुभेच्छा ऐकल्यानंतर खरंच मनापासून आनंद होतो. मी आपल्या सर्वांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपण भेटूया धन्यवाद असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.