जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा पदभार स्वीकारला. (NCP MLA Ajit Pawar has been appointed as Leader of Opposition of Maharashtra state legislative assembly)
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे – फडणवीस युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. विधानसभेत शिंदे सरकारने आज विश्वास दर्शक ठराव जिंकला.
महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद आले आहे. या पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अजित पवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात येत असल्याचे जाहिर केले.
निवड जाहीर होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांची सभागृहात भेट घेऊन अभिनंदन केले. त्यानंतर सर्वच नेत्यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले.