जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। अगामी 2022 या नव्या वर्षांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका होणार आहेत.या निवडणुकीच्या मैदानात उतरण्याआधीच राजकीय बळ आजमावण्याची आणि वाढवण्याची रंगीत तालिम जवळा गावात पार पडली. निमित्त होते ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे. म्हणूनच येथील निकाल तालुक्याच्या राजकारणात चर्चेत आला आहे.
जामखेड तालुक्याच्या राजकारणात महत्वाच्या असलेल्या जवळा ग्रामपंचायतवर सध्या युवा नेते प्रशांत शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या भावजयी वैशाली शिंदे ह्या सरपंच आहेत. साॅप्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रशांत शिंदे यांच्या राजकारणाचा ‘श्रीगणेशा’ भारतीय जनता पक्षातून झालेला आहे. मागील पाच वर्षे ते माजी मंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून भाजपात कार्यरत होते.
विधानसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिंदे यांना भाजपातून डावलले जाऊ लागले. प्रशांत शिंदे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे कारण पुढे करून त्यांना पक्षातून काढण्यात आले. प्रशांत शिंदे सारख्या निष्ठावंत युवा कार्यकर्त्यावर भाजपने अन्याय केल्याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. प्रशांत शिंदे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अश्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानुसार आमदार रोहित पवार यांनी प्रशांत शिंदे यांना राष्ट्रवादीत प्रवेश तर दिलाच, शिवाय त्यांचे पक्षात जोरदार लाँचिंगही घडवून आणले. काही दिवसापुर्वीच हा सोहळा नान्नजमध्ये पार पडला होता.
जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या काळातच युवा नेते प्रशांत शिंदे हे राष्ट्रवादीत डेरेदाखल झाल्याने जवळ्याच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाला विजय मिळवणे महत्वाचे होते. येथील निकालातूनच शिंदेंचे राष्ट्रवादीतील स्थान अधिक बळकट आणि दखलपात्र ठरणार होते. त्यामुळेच शिंदे विरोधकांकडून ऐडीचोटीचा जोर लावून शिंदेंची कोंडी करायचीच असा निर्धार करून राजकीय मोर्चेबांधणी हाती घेण्यात आली होती. मात्र विरोधकांचा हा डाव सपशेल फसला आहे. प्रशांत शिंदेंच्या राजकीय करिष्याची सत्वपरिक्षा पाहणाऱ्या जवळा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिंदे गटाला घवघवीत यश मिळाले. अगामी जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांची रंगीत तालीम या निवडणुकीत घडल्याने हा निकाल अनेक अर्थाने महत्वाचा आहे.
युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत नय्यूम अस्लम शेख या नवख्या तरूणाने वार्ड क्रमांक 5 मधून दणक्यात विजय मिळवला. शेख यांच्या विजयात प्रशांत शिंदे यांच्यासह जवळा ग्रामविकास पॅनलच्या प्रत्येक शिलेदाराने सिंहाचा वाटा उचलला. नय्यूम शेख हे आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शेख यांच्या विजयासाठी प्रशांत शिंदे आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. प्रशांत शिंदे यांनी मुस्लिम समाजाला न्याय दिल्याने तालुक्यातील मुस्लिम बांधवांमध्ये प्रशांत शिंदे हे लोकप्रिय ठरले आहेत.
मुस्लिम समाजातील जेष्ठ नेते व ग्रामपंचायत सदस्य शब्बीरभाई शेख यांच्या निधनामुळे जवळा ग्रामपंचायतीची पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत स्व शब्बीरभाई शेख यांच्या कुटूंबातील सदस्याला संधी देण्याबाबत अनेक बैठका झाल्या पण कुटूंबातील सदस्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुस्लिम समाजातून नय्यूम शेख या नावावर शिक्कामोर्तब करत उमेदवारी देण्यात आली. वास्तविक निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच शिंदे विरोधकांनी शिंदेंचा राजकीय काटा काढण्यासाठी एक उमेदवार दिला आणि निवडणूक लागली होती.
एकास एक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने यात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. एका समाजाची मोठी वोटबँक असल्याने शिंदेंच्या राजकीय चमत्काराची सत्वपरिक्षा होती. शिंदे यांच्या गटाला कसल्याही परिस्थितीत पराभूत करायचेच यासाठी शिंदे विरोधकांनी मजबूत मोर्चेबांधणी केली. अनेक चेहरे पडद्याआडून राजकीय सोंगट्या फिरवत होते. पण तेच चेहरे शेवटच्या टप्प्यात मैदानात उतरून प्रचारात सक्रिय झाले होते. यातून शिंदे गटाला धक्का बसणार असेच बोलले जाऊ लागले होते.
परंतू प्रचाराच्या रणधुमाळीत शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विरोधकांनी उभारलेल्या तटबंद्या उध्वस्त करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेला यश आले. पोटनिवडणुकीच्या निकालात नय्यूम शेख यांनी घवघवीत विजय मिळवला. या निकालाचा खरा विजयाचा फेटा प्रशांत शिंदे यांच्या मस्तकी बांधला गेला. या निकालातून प्रशांत शिंदे हे सर्व समाज घटकाला न्याय देणारं नेतृत्व असल्याचं अधोरेखित झाले. यामुळेच जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या निकालाची चर्चा तालुक्याच्या राजकारणात जोरदार चर्चेत आहे.
स्वर्गिय जेष्ठ नेते श्रीरंगभाऊ कोल्हे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सतत मुस्लिम समाजाला न्याय देण्याची भूमिका वठवली होती. स्वर्गिय श्रीरंगभाऊ कोल्हे यांच्या राजकारणाचा कित्ता प्रशांत शिंदे यांनी जवळा पोटनिवडणूकीत गिरवला. स्वर्गिय भाऊंचा राजकीय विचार यापुढेही जिवंत ठेवला जाणार असाच संदेश यानिमित्ताने विरोधकांना दिला आहे.
जवळा ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत जात आणि पक्ष हे दोन महत्वाचे होते. विरोधकांनी याच मुद्द्यांवरून निवडणुकीला हवा दिली होती. परंतू प्रशांत शिंदे यांनी विरोधकांच्या या मनसुब्यांना बेचिराख करत निर्विवादपणे गड राखला. सर्वसमावेशक राजकारण हाच आपला मूलमंत्र असल्याने या निवडणुकीतून प्रशांत शिंदे यांनी अधोरेखित केले. तसेच जनतेलाही हाच विचार हवा आहे हेच या निकालातून अधोरेखित झाले. त्यामुळे जवळ्याच्या अगामी राजकारणात द्वेषाच्या राजकारणाला जनता मूठमाती देणार असेच यातून स्पष्ट होत आहे.
प्रशांत शिंदे यांनी आजपर्यंत सरपंचपदाच्या काळात केलेल्या कामाची जनतेकडून पोचपावती मिळणार का ? याचीही उत्सुकता पोटनिवडणुकीच्या माध्यमांतून सर्वांनाच होती. जनतेने शिंदे यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास शिंदे यांच्या कारभारावर जनता समाधानी असल्याचाच संदेश देणारा आहे.
प्रशांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जवळ्यात दमदार एन्ट्री केल्याने राष्ट्रवादीची जवळ्यात ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीच्या विजयामुळे भाजपमध्ये मात्र मोठी अस्वस्थता पसरली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी भाजपला अपयश आले. हा पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारा आहे अशी चर्चा आता रंगली आहे.