भाजपकडून शरद पवारांना दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स, ‘या’ नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत काका विरूध्द पुतण्या ही लढाई रंगली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात झालेली कथित गुप्तभेट चर्चेत आली आहे. या भेटीत शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या पदांच्या ऑफर देण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे पवार काका पुतण्याच्या भेटीमुळे शरद पवारांच्या भूमिकेविषयी आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.
शरद पवार व अजित पवार यांच्यात पुण्यातील एका उद्योगपतींच्या बंगल्यावर बैठक पार पडली. गुप्तबैठकीची वाच्यता जगजाहीर झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेही उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांविषयी गौप्यस्फोट करत राजकीय वर्तुळात धुराळा उडवून दिला आहे.
भाजपकडून शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष NDA मध्ये आणण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. शरद पवार यांना भाजपकडून दोन मोठ्या पदांच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री पद व निती आयोगाचे अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. हीच ऑफर घेऊन अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र शरद पवारांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
या बैठकीत जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं. भाजपने आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली. भाजपला आता शरद पवार यांनाही आपल्यासोबत घ्यायचं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळावं म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
शरद पवार आणि अजितदादा यांच्यातील भेटीवरून शिवसेनेत नाराजी आहे. काँग्रेसलाही या भेटी मंजूर आहेत काय? असा सवाल चव्हाण यांना करण्यात आला. त्यावर, या बैठकींची किती गरज आहे, याचा निर्णय शरद पवार यांनीच घ्यायचा आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.