मुख्यमंत्र्यांना विनंती अन् राम शिंदेंवर पवारांचा निशाणा, कर्जत दिवाणी न्यायालय स्थगितीवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारकडून महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक मोठे निर्णयांसह विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील अनेक कामांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरू केला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयाचा दणका आमदार रोहित पवारांनाही बसला आहे.
आमदार रोहित पवार यांनी मोठ्या प्रयत्नातून कर्जत – जामखेडसाठी कर्जत येथे दिवाणी न्यायालय मंजूर करून आणले होते, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या काही दिवस आधी हा निर्णय झाला होता. आता शिंदे सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सरकारच्या स्थगिती निर्णयावरून राज्याचे राजकारण तापू लागले आहे. यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
कर्जत येथे मंजुर करण्यात आलेल्या दिवाणी न्यायालयास स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी अशी विनंती पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ट्विटद्वारे केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज: उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची होणार भेट, भाजप नेत्यांनी मदत केली, दिपाली सय्यद यांचे खळबळजनक ट्विट !
रोहित पवारांनी वेधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लक्ष
आमदार रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्या मतदारसंघातील पक्षकारांची ‘तारीख पे तारीख’ या त्रासातून सुटका व्हावी आणि वकीलांचीही सोय व्हावी म्हणून मी गेली दोन-अडीच वर्षे पाठपुरावा करुन मविआ सरकार असताना कर्जतला दिवाणी न्यायालय मंजूर करुन आणलं. पण या सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला स्थगिती दिली.
छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा
कदाचित, राज्य पातळीवरील मोठ्या निर्णयांना स्थगिती देताना तालुका पातळीवरील दिवाणी न्यायालयासारख्या छोट्या निर्णयालाही स्थगिती देण्याचा निर्णय अनावधानाने झाला असावा. त्यामुळं माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, याबाबत आपण व्यक्तिशः लक्ष घालून या निर्णयावरील स्थगिती उठवावी.
मुख्यमंत्र्यांना विनंती अन् राम शिंदेंवर पवारांंचा निशाणा
केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला हरकत नाही, पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे माझ्या मतदारसंघात अनेकजण आहेत. कदाचित मी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या दिवाणी न्यायालयाच्या बाबतीतही श्रेय घेण्यासाठी असे लोक पुढं यायला कमी करणार नाहीत असे म्हणत रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.