Rohit Pawar News | रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल : भाजपच्या नेत्यानी प्रशांत शिंदेंना बेईज्जत करण्याचा प्रयत्न केला
भाजपच्या कार्यकर्त्यांना रोहित पवारांनी दिले खुले आमंत्रण
जामखेड टाईम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । Rohit Pawar News | गावाच्या हितासाठी प्रशांत शिंदे (Prashant shinde) माझ्या संपर्कात असेल, गेली सहा सात महिने आम्ही त्या जवळा (jawala) गावामध्ये मनापासून लोकांच्या हिताची कामं केली असतील, मग अश्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला राजकारणच दिसत असेल तर काय हरकत नाही असे सांगत प्रशांत शिंदे सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीत प्रवेश देताना आम्हाला आनंद होत आहे असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.
जामखेड तालुक्यातील नान्नजमध्ये मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे यांच्या कामाचे कौतूक करत भाजपचा जोरदार समाचार घेतला. आमदार रोहित पवार व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर उपस्थितीत प्रशांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी पुढे बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, ज्यांनी माझ्या इलेक्शनमध्ये माझ्यासाठी रक्ताचं पाणी केलं ते सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यांचं कार्य मी आयुष्यभर विसरणार नाही. पण एखादा नवीन कार्यकर्ता आपल्या पक्षात येत असेल आणि आपले हात भक्कम करत असेल आणि तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर त्याला साथ दिली असेल तर मग तो कार्यकर्ता आपल्या पक्षात का नको ? असा सवाल करत आमदार रोहित पवार यांनी प्रशांत शिंदेंना राष्ट्रवादीत प्रवेश का दिला यावर भाष्य केले.
पवार पुढे म्हणाले त्यांचं काम बघितलं, तिथं असणारे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि आम्ही सर्वानी मिळून त्या ठिकाणी ठरवलं की एखाद्या चांगल्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल तर त्याला आपण न्याय दिला पाहिजे यासाठी प्रशांत शिंदेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी दाखवलेल्या एकनिष्ठतेचे पवारांनी केले कौतुक
माझ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये प्रशांत शिंदेंना भेटलो होतो. तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की, तुम्ही राष्ट्रवादीत या, वातावरण बदललयं,परिवर्तन झालं पाहिजे असं लोकांच्या मनामध्ये आहे. अश्या परिस्थितीत जर तुम्ही इथे आलात तर चांगला संदेश त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊ शकतो. पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की, त्यांनी मला त्यावेळी सांगितलं होतं की, मी राजकारणात फार पूर्वीपासून नाहीये.पाच सात वर्षापुर्वी मी राजकारणात आलो आहे. जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा दीड दोन लाख रूपये महिन्याच्या नोकरीला बाजूला ठेऊन फक्त सामान्य लोकांची सेवा करायची म्हणून मी राजकारणात आलो. तेव्हा मी भाजपात प्रवेश केला होता.
सरपंच झाल्यानंतर लोकांच्या हितासाठी जे काही करायचं त्यासाठी सातत्याने त्यावेळेसच्या आमदार आणि मंत्री राम शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. पण माझी जबाबदारी होती की, माझं काम झालं नसलं झालं तरी कार्यकर्ता म्हणून भाजपाचं मनापासून काम करायचं असा शब्द भाजपच्या नेत्यांना तेव्हा दिला होता. माझ्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही कितीही संपर्कात असलो तरी त्यावेळेस माझ्या विरोधात त्यांनी काम केलेलं होतं असं सांगत आमदार रोहित पवारांनी प्रशांत शिंदेच्या एकनिष्ठतेचे कौतूक केले.
निवडणूक संपली, राजकारण संपलं
यावेळी पवार पुढे म्हणाले, इलेक्शन काळात मी शब्द दिला होता, इलेक्शन पुरतं आम्ही राजकारण बघत असतो. पण इलेक्शन झाल्यानंतर आपण समाजकारणाची भूमिका सातत्याने मांडत असतो. जेव्हा एखादा चांगला सरपंच पुढाकार घेत असेल आणि आपल्या गावच्या हिताचं काम त्या ठिकाणी मांडत असेल तर आम्ही सुध्दा लोकांकडे बघून निधी द्यायला मागे पुढे करत नाही.
जवळा आणि नान्नज या गावांमध्ये काही प्रमाणात मतदान कमी झालं असेल पण मला या दोन्ही गावांमध्ये मतदान झालं, काही लोकांनी विरोधात केलं असेल पण काही लोकांनी माझ्याही बाजुने मतदान केलयं ना? आम्ही अश्याप्रकारचं भेदभाव कधी करत नसतो. तश्याच पध्दतीने प्रशांत शिंदे असतील किंवा तिथे असलेले जवळ्याचे सर्व नागरिक यांच्याकडे बघून त्या ठिकाणी आम्ही जो निधी दिला तो मनापासून दिला.
भाजपकडून प्रशांत शिंदेंना बेईज्जत करण्याचा प्रयत्न झाला
मगाशी बोलत असताना ते (प्रशांत शिंदे) थोडेसे भावनिक झाले. राष्ट्रवादीतून काही लोकं इतर पक्षात जात असतात पण अश्याप्रकारे एखाद्या कार्यकर्त्याने जर मनापासून त्याठिकाणी काम केलं असेल तर त्या कार्यकर्त्याचा अपमान करून राष्ट्रवादीतून कधीच कोणी गेलेलं नाही. पण या (प्रशांत शिंदे) चांगल्या कार्यकर्त्याला त्याठिकाणी (भाजपात) फक्त कुठे तरी चर्चा आहे. प्रशांत शिंदे हा कार्यकर्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादीत प्रवेश करेल. मग या कार्यकर्त्याचा त्याठिकाणी जो सन्मान आहे तो पायाखाली तुडवून प्रशांत शिंदेंना बेईज्जत करण्याचा प्रयत्न भाजपाच्या काही नेत्यांनी केला ही अतिशय चुकीची गोष्ट आहे.असे सांगत रोहित पवारांनी भाजपमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांची गळचेपी करण्याबरोबरच बेईज्जती केली जात असल्याच्या गोष्टीवर भाष्य करत भाजपचा जोरदार समाचार घेतला.
भाजपच्या कार्यकर्त्यांनो…
जर गावाच्या हितासाठी तो (प्रशांत शिंदे) माझ्या संपर्कात असेल. गेली सहा सात महिने आम्ही त्या जवळ्यामध्ये मनापासून लोकांच्या हिताची कामं केली असतील मग अश्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला राजकारणच दिसत असेल तर काय हरकत नाही.या तालुक्यातले असतील किंवा कर्जत तालुक्यातील जे कोणी लोकांच्या हिताचे काम करणारे भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असतील त्या सर्व लोकांना मला सांगायचयं त्या पार्टीमध्ये (भाजपमध्ये) तुम्हाला जर बदनाम करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुम्ही लोकांच्या हितासाठी काम करत असाल आणि आमचे त्या गावातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते तुमच्या बरोबर असतील तर तूम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करू शकता. लोकांच्या हिताची कामे आपण एकत्रित करू असे अवाहन करत आमदार रोहित पवारांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत दाखल होण्याचे खुले आमंत्रण दिले.