जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आजचा कार्यक्रम होऊ नये, असा विरोधकांचा प्रयत्न होता. विकासामध्ये आणि सामान्य लोकांना मदत देण्यामध्ये जर कोणी आडवं आलं तर याद राखा. तो पदाधिकारी असो, तो आमदार असो, नाहीतर कोणीही असो, आम्ही त्याला कदापी सोडणार नाही, असा सज्जड इशारा देत आजच्या कार्यक्रमाला अधिकारी उपस्थित राहू शकले नसले तरी, त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच 20 हजार लोकांसाठी इष्टांक निर्माण करता आला असे प्रतिपादन आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनी केले.
जामखेडला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थी मेळावा आज संपन्न झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार रोहित पवार बोलत होते. यावेळी मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, सूर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, बबन तुपेरे, नरेंद्र जाधव सह आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेेळी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्ता कुणाचीही आली तरी मतदारसंघाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे निधी आणण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असा विश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला.पुर्वी मतदारसंघात कुठलीही निवडणूक असली की बंदुकीशिवाय काम होत नव्हतं परंतू आता परिस्थिती बदलली आहे.गेल्या अडीच वर्षांत मतदारसंघात शिस्त आपण आणली आहे.
सत्ता बदल झाल्यानंतर सत्तेत असलेल्या लोकांचा खासकरून मंत्र्यांचा विषय मी घेत नाही, पण कधी कधी इथे असणारे काही लोकं असतात त्यांना पूर्वीची सवय असते. समजा आता सत्तेत गेल्यानंतर कदाचित अधिकाऱ्यांना सांगुन ही जी घडी बसलेली आहे, ज्याच्यामध्ये सामान्य लोकांची कामं होतायेत, ती घडी त्यांचे काही कार्यकर्ते किंवा ते स्वता: कुठेतरी विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतील, त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही काही शांत बसणार नाही असा इशारा आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता रोहित पवार यांनी दिला.
कोविड काळात मदत केली, कोविड असतानाही विकासाची कामे सुरू ठेवली. जामखेड तालुक्यातील 100 टक्के गावात जलजीवन योजना राबवली जाणार आहे. ही योजना सोलारवर असेल असे सांगत निवडणूक काळात आम्ही पण आरोग्य शिबीरं घेतली पण निवडणूक झाल्यानंतर आम्ही लोकांना विसरलो नाही. मतदारसंघात फिरता दवाखाना सुरू केला त्याचा 80 हजार लोकांना फायदा झाला असे यावेळी पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, कर्जत – जामखेड तालुक्यासाठी असलेला इष्टांक वापरला जात नव्हता त्यामुळे केशरी रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नव्हते ही गोष्ट ध्यानात आल्यानंतर मागील दोन वर्षांत 13 हजाराचा इष्टांक संपवला. तसेेच जे लोक मयत झालेत, जे बाहेरगावी गेलेत अश्या लोकांची नावे कमी केली. मागील तीन महिन्यात मतदारसंघासाठी 20 हजार लोकांसाठी इष्टांक निर्माण केला. त्यामुळे कर्जत तालुक्यातील 10 हजार 448 व जामखेड तालुक्यातील 8 हजार 427 अशी एकूण 18 हजार 875 गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. व्यक्तिगत लाभाच्या योजना जनतेला मिळाल्या हव्यात ही आमची भूमिका आहे असे पवार म्हणाले.
17500 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी
बालसंगोपन योजनेअंतर्गत 1800 जणांना लाभ दिला. मतदारसंघात 7500 लर्निंग लायसन्स मोफत दिले तसेच 3500 परमनंट लायसन्स दिले. नांंदणी नदीचे 17 किलोमीटर नदी खोलीकरण केले. 17500 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली.जामखेडमधूून 12 हजार वारकरी पंढरीला गेले आहेत. पंढरपुरात त्यांच्यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत असे यावेळी रोहित पवार म्हणाले.
पाणंद योजना
महाराष्ट्रात पाणंद रस्त्यांची सर्वाधिक कामे मतदारसंघात झाली. पाणंदच्या विविध योजनेत 80 कोटी रूपये आणले तसेच आता 19 कोटी मंजूर केले आहेत. मतदारसंघातील 950 रस्ते पाणंदमध्ये घेतली जाणार आहेत. पाणंद रस्ते योजनेमुळे अडीच लाख लोकांना फायदा झाला असा दावा यावेळी आमदार रोहित पवार यांनी केला.
अधिकाऱ्यांची दांडी
आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून जामखेडला राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थी मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमाला संंबंंधित विभागाचे अधिकारी गैरहजर होते. हा मेळावा होऊ नये यासाठी विरोधकांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला अशी चर्चा कार्यक्रमस्थळी होती. राज्यात भाजपची सत्ता आल्याने कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष पुन्हा भडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.