चोंडीत 31 मे रोजी राष्ट्रवादी करणार जोरदार शक्तिप्रदर्शन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, नेते उपस्थित राहणार आहेत. (Rohit Pawar’s initiative On May 31, the NCP will hold a strong Demonstration of strength in Chondi)

चोंडीत ३१ मे रोजी होणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे, या कार्यक्रमातून राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे आता बोलले जात आहे. त्यादृष्टीने कर्जत – जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी गावोगावी जाऊन नागरिकांना जयंती सोहळ्याचे निमंत्रण देत असल्याचे दिसत आहेत.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर चोंडीत रंगरंगोटी, सुशोभीकरणाची कामे, चापडगाव येथील कमानीचे सुशोभीकरण आणि चोंडीला जोडणारा रस्ता चकचकीत झाला आहे. दरम्यान कोरोनामुळे मागील दोन वर्ष अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळा होऊ शकला नव्हता, मात्र यंदा होणारा जयंती सोहळा मोठ्या दिमाखात होणार असल्याने यंदाच्या जयंती सोहळ्यासाठी राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन हाती घेतले आहे.

३१ मे रोजी होणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सोलापूरचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्यासह राज्यातील अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

जाहिरात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आमदार रोहित पवार यांच्याकडून सुरू आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  आमदार रोहित पवार यांची टीम जोमाने काम करत आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार रोहित पवार हे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.

३१ मे रोजी असा असेल कार्यक्रम

१)  सकाळी ९ ते १०:  ह.भ.प रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांचे कीर्तन

२) सकाळी १० ते १: मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम

३) सायं.६ वाजता : ५० कलाकारांची धनगरी झांज व ढोल वादनाने मानवंदना

४) सायं.६.३० वाजता : संबळ व हलगी यांची जुगलबंदी

५) सायं.७ वाजता : उदघाटन

६) सायं.७.३० वाजता : शाहिरी/पोवाडे ( सादरकर्ते-शाहीर देवानंद माळी)

७) सायं.८ वाजता : मनोगत/संवाद(देवदत्त नागे, आदिती जलतरे)

८) सायं ८.३० ते १० वाजता : लोकगीते
सादरकर्ते – (उर्मिला धनगर, उत्कर्ष शिंदे,गणेश चंदनशीवे, अभिजित कोसंबी, प्रसन्नजीत कोसंबी,भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट ग्रुप)

दरम्यान ३१ मे रोजी चोंडीत होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यासाठी कर्जत-जामखेड मतदारसंघासह राज्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.