Rohit Pawar | रोहित पवारांचा गंभीर आरोप, सत्ता बदलामुळे काही लोकं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायेत
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख ।“सत्ता बदलामुळे काही लोकं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतायेत, मी अधिकाऱ्यांना सांगितलयं, ज्या पध्दतीने मी सामान्य लोकांच्या पाठीशी आहे,त्याच पध्दतीने मी त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहे, पुर्वी ज्यापध्दतीने ब्लॅकमेल व्हायचं, दबावतंत्र व्हायचं, खोटे गुन्हे दाखल केले जायचे, अश्या पध्दतीचं काम मागील अडीच वर्षांत झालेलं नाही. याच्यापुढेही कोणी काय आलं, कितीही ताकद त्याच्याकडे असली तरी आम्ही ते करून देणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.”
राज्यातील सत्तांतराच्या नाट्यानंतर आमदार रोहित हे बुधवारी जामखेड दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात आमदार रोहित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
राज्यात जे सत्तांतर झालयं याकडे तुम्ही कसं पाहता ?
या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्तांतर झालं आहे, या सरकारला सहा महीने दिले पाहिजेत, येत्या सहा महिन्यांमध्ये कशा पद्धतीने ते निर्णय घेतात, कशा पद्धतीने ते काम करतात हे त्या ठिकाणी आपल्याला बघायला पाहिजे. असे सांगत पवार पुढे म्हणाले की, कर्जत- जामखेडमध्ये गेल्या दहा वर्षात जेवढा निधी आला नाही, त्यापेक्षा अधिक निधी गेल्या अडीच वर्षात आला आहे. विकासाची कामं आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात चालू आहेत.
येत्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे निधी कमी पडणार नाही, यासाठी तिथे असलेले मंत्री दुसऱ्या पक्षाचे असले तरी कर्जत जामखेडसाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल याचा प्रयत्न मी नक्कीच करेल. पण एवढंच की, ज्या लोकांनी याच्या आधी कामं केलेली नाहीत आणि आत्ता सांगत असताना लोकांना सांगतात मीच मंजूर केलेली कामं या आमदाराने केली आहेत.अशा गोष्टी ते बोलत असत्येत, “समोरासमोर या, लोकांसमोर आपण याबाबतीत चर्चा करू, मग लोकांना दाखवून देऊ खरा निधी कोणी आणलाय असे सांगत रोहित पवार यांनी राम शिंदे यांना थेट अव्हान दिले.”
रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल : जर कोणी आडवं आलं तर याद राखा
“तुम्हाला पद मिळावं, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल, पद मिळाल्यानंतर तुम्हाला मनापासून शुभेच्छा मी याठिकाणी देतो, या मतदारसंघांमध्ये विकास होत असताना तो थांबवण्यासाठी नाहीतर, एखाद्या व्यक्तीला क्रेडिट न जाण्यासाठी जर विकासाच्या आड कोणी येत असेल तर ते आम्हाला चालणार नाही, विकासाबाबत तुम्ही सोबतच येत असाल तर तुमचे त्याठिकाणी स्वागत आहे असे पवार म्हणाले.”
अधिकारी लाभार्थी मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत असं तुम्ही भाषणात म्हणालात तो नेमका प्रकार काय होता ?
या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, जेव्हा एखाद्याची सत्ता जाते आणि दुसऱ्याची येते त्यांना असे वाटते की, ज्या गोष्टी लोकांच्या हिताच्या होत आहेत त्या होऊ नये, काही लोकांचं असं म्हणणं आहे कि, अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला जाऊ नये अशा काही गोष्टी त्याठिकाणी घडल्या. पण तरीसुद्धा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आम्ही तर आभार व्यक्त करतोच या ठिकाणी आले नसले तरी, या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून इथे असणारे लाभार्थी, त्यांचा जो मेळावा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने त्याठिकाणी झाला. त्यांना त्यांच्या गावांमध्ये जाऊन त्यांना पत्र मिळेल, मग कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोन महिन्यानंतर त्यांना धान्य मिळेल असे पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांकडे आपण कसे पाहता ?
या प्रश्नावर बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केलेल्या आरोपांसंदर्भामध्ये आकडेवारी दिलेली आहे.आम्ही आमदार म्हणून शिवसेनेच्या मंत्र्याकडे जायचो तेव्हा काय पद्धतीने त्या ठिकाणी निधी दिला जातो, कशा पद्धतीने शिवसेनेच्या आमदारांना कार्यकर्त्यांना निधी दिला गेला या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत.
Pradhan Mantri Pik Vima Yojana 2022 । प्रधानमंत्री पीक विमा योजना । खरीप हंगाम 2022 |अहमदनगर जिल्ह्यातील 10 पिकांसाठी 4 लाख 30 हजार हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित
“शिवसेनेचे आमदार मंत्री कार्यकर्ते त्यांच्यासाठी तर आम्ही आमच्यासाठी प्रयत्न करत होतो. निधी काहीच मिळाला नाही अशी कुठेच गोष्ट त्याच्यामध्ये झाली नाही. उलट पाच वर्षांमध्ये भाजप सोबत असताना जितका निधी मिळाला त्यापेक्षा अधिक निधी या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि आमदारांना मिळाला, भाजपसोबत जाण्याची कारण वेगळी असू शकतात, ती कारण लोकांपुढे आली पाहिजेत. उगाचच काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव घेऊन या दोन पक्षांच्या नावावर कुणीही खापर फोडलं नाही पाहिजे.”
अगामी बाजार समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार आहात ? काय स्ट्रेटर्जी असेल ?
या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, पूर्वीची जशी स्ट्रॅटर्जी आहे, लोकांत जाऊन लोकांत राहून इलेक्शन लढायचं तीच स्ट्रॅटर्जी त्याच्यामध्ये असणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, कितीही ताकद त्यांनी लावली तरी लोकांचा आमच्यावर आणि आमचा लोकांवर विश्वास असल्यामुळे तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर विश्वास असल्यामुळे येणारी निवडणूक त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष म्हणून लढवणार आहोत असे पवार यांनी स्पष्ट केले.
“विकासामध्ये आणि सामान्य लोकांना मदत देण्यामध्ये जर कोणी आडवं आलं तर याद राखा. तो पदाधिकारी असो, तो आमदार असो, नाहीतर कोणीही असो, आम्ही त्याला कदापी सोडणार नाही असा सज्जड इशारा आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना दिला आहे.”
यावेेळी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, सत्ता कुणाचीही आली तरी मतदारसंघाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. तुमचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे निधी आणण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असा विश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला.