जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। कर्जत – जामखेड मतदारसंघातील तुर उत्पादक शेतकऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नाबाबत आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. या भेटीत आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अब्दुल सत्तार यांचे लक्ष वेधले.
कर्जत-जामखेड मतदारसंघात ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अनेक गावांमध्ये समाधानकारक पाऊस पडला नसल्याने तूर, उडीद, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे ही बाब त्यांनी कृषीमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच कर्जत – जामखेड तालुक्यातील तुर पिकांवर वांझ रोग आला आहे. कर्जत तालुक्यात एकूण 11000 हेक्टर तुरीचा उत्पादन घेतलं जात असून जामखेड तालुक्यात एकूण 10000 हेक्टरवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. तुरीचे पिक वांझ रोगाला बळी पडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान लक्षात घेता, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला द्यावे व पिक विमा योजनेतून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व पिक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली.
आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे कर्जत जामखेड मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नावर लक्ष वेधल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी तूर पिकांवर आलेल्या रोगामुळे होत असलेल्या नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना दिले. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी कृषी सचिवांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तुरीवर वांझ रोगामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीवर व देण्यात येणाऱ्या नुकसाभरपाईवर सरकारने लक्ष द्यावं. तसेच नुकसान झाल्यास पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून व पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना सरकारी खर्चातून मदत द्यावी, यासोबतच ज्या भागात समाधानकारक पाऊस पडला नाही अशा भागातील शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई देऊन पोखरा योजनेअंतर्गत विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाग सुद्धा घेण्यात यावा अशी विनंती कृषी मंत्री महोदयांना भेटून केली अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी केली.
जामखेड टाइम्सच्या वृत्ताची आमदार रोहीत पवारांनी घेतली दखल
जामखेड तालुक्यातील तुर पिकावर घोंघावतेय वांझ रोगाचे संकट या मथळ्याखाली जामखेड टाइम्सने 25 ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी वांझ रोगामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीत सरकारची मदत मिळावी यासाठी कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची भेट घेऊन वांझ रोगामुळे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधले. यामुळे जामखेड तालुक्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.