जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघात पक्षांतराचे ‘वारे’ पुन्हा वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीने ‘इनकमिंग’ मोहिम गतिमान केली आहे. रोहित पवारांनी काही महिन्यांपुर्वी कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे समर्थक बड्या नेत्याला फोडल्यानंतर आता जामखेडमध्ये थेट विखे समर्थक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. यामुळे विखे गटाला जामखेड तालुक्यात मोठे भगदाड पडले आहे.
अगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत आमदार रोहित पवारांनी मतदारसंघात आक्रमकपणे राजकीय डावपेच टाकण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांच्या गटाचे जामखेडमधील अस्तित्व संपुष्टात आणण्याची खेळी रोहित पवारांनी खेळली आहे. विखे गटाचे दोन मोठे नेते पवारांच्या गळाला लागले आहेत.
विखे यांचे कट्टर समर्थक असलेल्या राळेभात बंधूंनी पवारांचे नेतृत्व स्वीकारत शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे जामखेड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. विशेषता : सहकार क्षेत्रात याचे मोठे परिणाम दिसणार आहेत. जामखेड तालुक्यातील जवळपास 90% सेवा संस्था विखे समर्थक असलेल्या राळेभात यांच्या ताब्यात आहेत. राळेभात बंधूंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सहकारावर राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व निर्माण होणार आहे. येत्या काही दिवसांत सहकारातील अनेक महत्वाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
जामखेड तालुक्यात विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांच्या कुटुंबाला ओळखले जाते. विखे कुटुंबाने सातत्याने राळेभात यांना राजकीय ताकद देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र राळेभात यांच्या दोन्ही मुलांनी राष्ट्रवादीशी पर्यायाने पवार कुटुंबाशी घरोबा केल्याने विखे गट जामखेडमधून संपुष्टात आल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. विखे गटात आता जनाधार नसलेले काही मोजके कार्यकर्ते यापुढे दिसतील असेच चित्र जामखेड तालुक्यात आहे.
खासदार सुजय विखे पाटील यांना जामखेड तालुक्यात आपला गट मजबूत करण्याकडे नव्याने लक्ष द्यावे लागणार आहे. दरम्यान राळेभात बंधूंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे पडसाद अगामी काळात काय उमटतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.खासदार सुजय विखे पाटील या संपुर्ण प्रकरणावर काय भाष्य करणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कर्जत – जामखेड मतदारसंघातील भाजपातील अनेक नेते राष्ट्रवादीत दाखल होऊ लागल्याने मतदारसंघातील भाजपची तटबंदी उध्वस्त होऊ लागली आहे. रोहित पवारांचे चक्रव्यूह भेदण्यासाठी माजी मंत्री प्रा राम शिंदेंना पक्षातील निष्ठावंताना सोबत घेऊन नव्याने मतदारसंघात पक्षाची बांधणी करावी लागणार आहे.
जे नेते व कार्यकर्ते अजूनही हवेत आहेत त्यांना जमिनीवर आणावे लागणार आहे. आजही अनेकांची भाषा बदललेली नाही. शिंदे यांच्या मंत्रिपदाचे वारे अजूनही अनेक नेते आणि कार्यकर्त्यांच्या डोक्यातून गेलेले नाही. त्यामुळे शिंदे यांना पक्षातील आऊटगोईंग थांबवण्याबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी कसरत करावी लागेल यात ते किती यशस्वी होणार हे अगामी निवडणूकीत स्पष्ट होईल.
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार विरूध्द माजी मंत्री राम शिंदे हा संघर्ष एका वेगळ्या टप्प्यावर आला आहे. या संघर्षाची धार अगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आणि नगरपरिषद निवडणुकीत वाढताना दिसेल.या संघर्षात खासदार सुजय विखे पाटील यांची एन्ट्री होणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
राष्ट्रवादीत इनकमिंग मोहिम गतिमान झाल्याने जुन्या नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरू लागली. जुन्यांचे राजकीय पुनर्वसन होण्याआधीच नव्या नेत्यांचे राष्ट्रवादीत आगमन होऊ लागले आहे. आता जुन्या – नव्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आमदार रोहित पवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.