जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । महाराष्ट्राच्या OBC राजकारणाचे केंद्रबिंदु असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथुन OBC मतांची पक्की बांधणी करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली राष्ट्रवादी सरसावली आहे. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून चोंडीत 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी (ता. जामखेड) हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्म गाव आहे. 1995 साली तत्कालीन ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे यांच्या पुढाकारातून तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत कोट्यावधी रुपयांची विकासकामे येथे हाती घेण्यात आली. तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी चोंडीला भेट दिल्यानंतर चोंडी देशाच्या नकाशावर झळकली. तेव्हापासून देशभरातील अहिल्याभक्त दरवर्षी चोंडीला भेट देतात. माजी मंत्री राम शिंदे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमांतून चोंडीत भरीव कामे केली.
यशवंत सेनेच्या माध्यमांतून माजी मंत्री महादेव जानकर यांनी 20 वर्षांपासून चोंडीत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती. चोंडीच्या माध्यमांतून राज्यभरातील OBC संघटन मजबूत होऊ शकते हीच बाब हेरून महादेव जानकर यांनी राज्यातील OBC नेत्यांना चोंडीत दरवर्षी आमंत्रित करुन 31 मे हा राजकीय दिशा ठरवणारा दिवस बनवण्याची किमया साधली. यातूनच राष्ट्रीय समाज पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली. चोंडीने राज्याला महादेव जानकर यांच्या रुपाने महत्वाचा नेता दिला. जानकर फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले.
चोंडी येथे साजऱ्या होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीला राष्ट्रीय पातळीवरील घेऊन जाण्यासाठी महादेव जानकर यांनी मुंबईत 4 वर्षे जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला खरा पण चोंडीकडे फिरवलेली पाठ जानकर यांची लोकप्रियता घटवणारी ठरली आहे. जानकर यांना नव्याने चोंडीतुन राजकीय सारीपाट खेळावा लागेल असेच दिसत आहे.
चोंडीचे सुपुत्र तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज असलेल्या माजी मंत्री राम शिंदे आणि इतर वंशजांनी चोंडीतील जयंती उत्सवाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे परंतू तसे होत नसल्याने चोंडीतील जयंती कार्यक्रमावर इतर नेत्यांचा कब्जा होतो, दरम्यान राम शिंदे यांच्या पुढाकारातून गेल्या 10 वर्षांपासून जयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या अहिल्या भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
दरम्यान यंदाच्या जयंती सोहळ्यावर आमदार रोहित पवार यांनी पुर्ण कब्जा केला आहे. रोहित पवारांच्या पुढाकारातून चोंडीत भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कोरोना नंतर यंदा होत असलेल्या जयंती सोहळ्यासाठी धनगर आणि OBC समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याशिवाय स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. एकुणच अगामी निवडणूकांच्या दृष्टीने 31 मे रोजी होणारा कार्यक्रम राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे.
चोंडीत उद्या 31 मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव कार्यक्रमातून राष्ट्रवादी OBC मतांची पक्की बांधणी करण्यात यशस्वी होणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे चोंडीतील कार्यक्रमाला हजेरी लावणार का? याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.