VBA News marathi : महाविकास आघाडीच्या ‘त्या’ बैठकीबाबत प्रकाश आंबेडकरांचा पत्राद्वारे मोठा गौप्यस्फोट, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही भाजपसोबत जाणार…
VBA News Marathi : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पत्र (Letter) लिहित संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीत (MVA) येण्याचे अवाहन केले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पत्र लिहले आहे.या पत्रात त्यांनी महाविकास आघाडीच्या एका बैठकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.यातून महाविकास आघाडीच्या बैठकीतील मोठी बातमी फुटली आहे. (Prakash Ambekar Letter )
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात सहा मार्चला बैठक होणार असल्याची चर्चा होती. त्या आधीच आव्हाड व आंबेडकर यांनी ऐकमेकांना पत्र लिहले आहे.दोन्ही नेत्यांचे पत्र सोशल मीडियावर वायरल झाले आहे.आव्हाडांच्या पत्रापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी आव्हाडांना लिहिलेले पत्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडणार आहे याची दिशा स्पष्ट करणारं आहे.वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणुकीत एक ला चलो च्या मूडमध्ये असल्याचेच संकेत या पत्रातून मिळत आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.
श्री. जितेंद्र आव्हाड,
आपण लिहिलेले पत्र व्यक्तीगत आहे, राष्ट्रवादीचे नेते म्हणून लिहीलेले नाही असे आम्ही समजतो. आम्ही नेहमी मानत आलो आहोत की पक्षाची असो की व्यक्तीगत, राजकारणाची भूमिका एकच असली पाहिजे. तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार नाही याबद्दल व्यक्तीगतरित्या खात्री आहे. परंतु, आपल्या पक्षाबद्दल ती खात्री देता येत नाही. कारण या अगोदर आपल्या पक्षाने बीजेपी बरोबर समझोता केलेला होता.
त्यामुळे संविधान वाचविणे ही जी आपण व्यक्तीगत जबाबदारी घेतलेली आहे, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. पण आपला पक्ष संविधान वाचविण्यासाठी पुढे येईल का? याबद्दल आमच्या मनात शंका आहे.
आपल्या परीने आम्हाला संविधान वाचविण्यासाठी जे आणि जेवढे करणे शक्य आहे, तेवढे आम्ही संविधान वाचविण्यासाठी करत राहणार आहोत. त्यामुळे पत्राद्वारे आपण व्यक्तीगत संदेश पाठवला असला तरी त्यातून एक सूर दिसत आहे की, आम्ही संविधान वाचवायला निघालेलो नाही. या पत्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला हे सांगतो आहोत की, आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी त्या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी आमच्यातर्फे जेव्हा सांगण्यात आले की, आपल्याला मतदारांना हे आश्वासित करावे लागेल की निवडणुकीनंतर आम्ही बीजेपी किंवा आरएसएसबरोबर समझोता करणार नाही. तेव्हा आपल्या पक्षाचे जे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते, ते त्यावर काहीच बोलले नाहीत. ते शांत बसले आणि एका अर्थाने मौनातून त्यांनी विरोध दर्शविला. आपणच फक्त म्हणालात की “लेखी लिहून द्यायला काय हरकत आहे?” ज्या शिवसेनेला आपण सोबत घेतले आहे. त्या शिवसेनेचे प्रतिनिधी संजय राऊत यांनी उघडउघड असे लिहून देण्यास नकार दिलेला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर बघितले तर आम्हाला जर आपल्याबरोबर यायचे असेल, तर आम्हाला खात्री करुन घ्यावी लागेल की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर बीजेपीबरोबर जाणार नाहीत, याची खात्री तुम्हाला द्यावी लागेल आणि ती व्यक्तीगत नाही तर तुमच्या पक्षाला द्यावी लागेल.आपण लिहीलेले हे पत्र सोशल मीडियावर टाकले आहे का हे आम्हाला माहीत नाही. तुम्ही जर हे सोशल मीडियावर दिले नसेल तर आम्ही ही आपल्याला आश्वासित करतो की, आमचे हे पत्र सोशल मीडियावर जाणार नाही. परंतु, आपले पत्र जर सोशल मीडियावर गेले तर आमचे पत्रही सोशल मीडियावर जाईल.
ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं ते पाहूयात
मा. प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष,वंचित बहुजन आघाडी
आपणांस सविनय जयभीम !
मी शिव, फुले, शाहू , आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार- प्रसार व्हावा आणि जनमाणसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम, आपुलकी, माया निर्माण व्हावी, यासाठी मी कायम प्रयत्नशील असतो. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत.
महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत. त्यातील महत्वाचे नेते म्हणून आपणांकडे पाहिले जात आहे. आपणांकडे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे. या वारसाचा पूर्ण सन्मान ठेवून मी एकच विनंती करू इच्छितो की, तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचविणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहिल, यासाठी प्रयत्न करणे; अन् त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तरी तयार आहे.
आपणही याच विचारांचे आहात. संविधान आणि लोकशाही हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही.त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया !
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम