Ram Shinde News : आमदार राम शिंदेंसाठी जनतेचे शक्तीप्रदर्शन, शुक्रवारी कर्जतमध्ये काय घडलं ? वाचा सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । कर्जत जामखेड मतदारसंघात यंदा होणारी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात ‘आपल्या मातीतला आपलाच भूमिपुत्रच आमदार हवा’ अशी भूमिका घेऊन जनतेनेच निवडणूक हातात घेतली आहे. यामुळे स्थानिक भूमिपुत्र नेते आणि स्वाभिमानी जनता स्थानिक भूमिपुत्र आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे एकवटले आहेत. ‘आपला तो आपलाच’ म्हणत गावागावातून शिंदे यांना प्रचंड पाठिंबा वाढला आहे, याचाच प्रत्यय शुक्रवारी कर्जतमध्ये दिसून आला.
शुक्रवारी आमदार प्रा.राम शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला, कुठलाही गाजावाजा न करता, कुठलेही शक्तिप्रदर्शन न करता शिंदे यांनी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबतीला सामान्य नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी आमदार शिंदे यांनी गुरूवारी फेसबुक पोस्ट करत शुक्रवारी दुपारी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार असून कुठलेही शक्तीप्रदर्शन करणार नाही असे त्यांनी त्याद्वारे जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी फारसी गर्दी होणार नाही अशी अटकळ सर्वांनीच बांधली होती, पण कर्जत जामखेडच्या स्वाभिमान आणि आभिमानासाठी त्याचबरोबर भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी पेटून उठलेल्या सर्वसामान्य जनतेने शुक्रवार आमदार राम शिंदेंसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत नवा इतिहास घडवला.
शुक्रवारी आमदार राम शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कर्जत तहसील कार्यालयात येणार होते. शिंदे हे दाखल होण्यापूर्वीच सर्वसामान्य जनता व महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी जनतेने स्वयंस्फूर्तीने शिंदे यांच्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. जनतेच्या या कृतितून मतदारसंघात परिवर्तनाची हवा जोरदारपणे वाहत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.अर्ज भरल्यानंतर जनतेने शिंदे यांना बळजबरीने गाडीत बसवून त्यांची गाडीतून मिरवणूक काढली. एकुणच भूमिपुत्रांची लढाई आता जनतेने हातात घेतली असल्याचेच चित्र यावेळी दिसून आले.
ना गाड्या, ना पैसे, ना दबाव, ना बळजबरी, ना कसले आमिष असे काहीही न करता आमदार शिंदे यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टवर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे आमदार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याच नागरिकांमधून “भूमिपुत्र तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या घोषणा दिल्या जात होत्या, या घोषणांनी कर्जत शहर दणाणून गेले होते. कर्जत-जामखेडची निवडणूक जनतेने हातात घेतल्याचे हे बोलके चित्र शुक्रवारी कर्जतमध्ये दिसून आले.