संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली?; CM उध्दव ठाकरेंसोबतची बैठक रद्द, संभाजीराजे कोल्हापूरच्या दिशेने रवाना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्याच्या राजकारणात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेना या अशी ऑफर होती, मात्र ही ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली असल्याची माहिती समोर येत आहे. (Sambhaji Raje rejected Shiv Sena’s offer? Meeting with CM Uddhav Thackeray canceled, Sambhaji Raje leaves for Kolhapur)

छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी करावी अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली होती, काल दिवसभर मुंबईमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेतली होती.

संभाजीराजे आज दुपारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी जाणार होते,मात्र त्याआधीच एक मोठी घडामोड समोर आली असून छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेने दिलेली ऑफर धुडकावत मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक रद्द केली असल्याची माहिती समोर येत आहे.

छत्रपती संभाजीराजे हे आज पहाटे कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जात आहे, छत्रपती संभाजीराजे हे अपक्ष उमेदवारीवर ठाम असून, ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्याच पक्षात जाणार नसल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे यांची अपक्ष उमेदवारी निश्चित असल्याचे आता बोलले जात आहे. छत्रपती संभाजी राजे यांच्या उमेदवारीला भाजप सहित महाविकास आघाडीतील काही आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात काय निर्णय होतो, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांना वर्षा बंगल्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. संभाजीराजे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असल्याची चर्चा देखील होती.

आज (सोमवार 23 मे) 12 वाजता संभाजीराजे छत्रपती वर्षावर जाणार होते. त्यामुळे संभाजीराजे हातात शिवबंधन बांधणार का अशी चर्चा जोर धरू लागली होती. मात्र, आता संभाजीराजे वर्षावर जाणार नसल्याची माहिती आहे. राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेवार म्हणून उभे राहण्याचा निर्धार छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.