Man Blowing Turha : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ या पक्षाला कोणते पक्षचिन्ह मिळणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला ‘तुतारी फुंकणार माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे, अशी माहिती पक्षाने ट्विटर (X) वर दिली आहे.
राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी मोठ्या घडामोडी घडल्या.अजित पवार गटाने पक्षावर दावा ठोकला. याबाबतचा वाद निवडणूक आयोगात गेला. आयोगाने शरद पवारांना धक्का देत पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला सोपवले. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांनी सर्व याचिका फेटाळून लावत पण राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह त्यांनी अजित पवार गटाकडे सोपवले. त्यानंतर सुप्रीम कोर्टात शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती.
तत्पुर्वी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे नव्या पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत आयोगाकडे तीन पर्याय दिले होते. यातील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ हे नाव आयोगाने शरद पवार गटाला बहाल केले होते. मात्र चिन्ह दिले नव्हते. सोमवारी सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी झाली. त्यात कोर्टाने शरद पवार गटाला तातडीने पक्षचिन्ह देण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. गुरूवारी रात्री निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांचा गटाकडे ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव पक्षचिन्ह ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे असणार आहे. याच नावावर आणि चिन्हावर शरद पवार गटाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरताना दिसतील. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे आपल्या नव्या पक्ष आणि चिन्हासह निवडणुकीला सामोरे जाताना दिसणार आहे. या निवडणुकीत जनतेपर्यंत पक्षचिन्ह घेऊन जाण्यासाठी दोन्ही नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला कोणते चिन्ह मिळाले ?
केंद्रिय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी फुंकणारा माणूस’ (man blowing Turha) हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. गुरुवारी रात्री निवडणूक आयोगाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.