जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा सामना रंगला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.यामुळे राज्यात गेल्या सहा दिवसांपासून राजकीय सत्तासंघर्ष रंगला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
एकनाथ शिंदेंचे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मैदानात उतरले आहे. दोघांनी बंडखोरांविरोधात जोरदार हल्ला चढवला आहे. याशिवाय राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक अंदालने हाती घेतले आहेत. तसेच शिवसेनेने मुंबईत मेळावे घेत बंडखोरांचा जोरदार समाचार घेण्यास सुरूवात केली आहे.
कब तक छिपोंगे गोहाती में, आना ही पडेंगा …चौपाटी में
शिवसेनेचे युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. बंडखोरांचे बंड मोडीत काढण्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन मोठा गौप्यस्फोट केला आहे.ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची आता जोरदार चर्चा होत आहे.
आदित्य ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार. शिवसेनेवरचे प्रेम आपलेच राहणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेनी स्थापन केलेल्या नविन गटाच्या वैधतेबाबतही भाष्य केले आहे.एकनाथ शिंदे गटाकडे भाजपात किंवा प्रहारमध्ये विलिन होण्याचाच पर्याय आहे. त्यांचा स्वतंत्र गट होऊ शकणार नाही असेही आदित्य आपल्या भाषणात म्हणाले.
बंडखोरांना पुन्हा विधानसभेची पायरी चढू देणार नाही अशी थेट धमकीच आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे दिली आहे. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीत समोरासमोर या असे चॅलेंजही आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
दिलीप लांडे हातात हात घालून रडले होते. मात्र ते या बंडखोर गटासोबत कसे जाऊ शकतात, असा प्रश्नही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
15 ते 16 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र, बंडखोर, गद्दारांना क्षमा नाही असेही आदित्य ठाकरेंनी ठणकावले. अडीच वर्षे या सगळ्यांचे हिंदुत्व कुठे होते? हिंदुत्वातील ‘ह’ ही नव्हता असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केली.
20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते. मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर एकनाथ शिंदेंनी टाळाटाळ केली होती. त्यानंतर 20 जूनला एकनाथ शिंदेंनी बंड केले.असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
संदिपान भुमरे, संजय शिरसाट, जैस्वाल यांना मोठा फंड देण्यात आला असा खळबळजनक दावाही आदित्य ठाकरे यांनी भाषणात केला आहे.