मोठी बातमी : हायकोर्टाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा दणका, कोर्टाने फेटाळली ‘ती’ याचिका, उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी
Shiv Sena Dasara Melava 2022 । शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी शिंदे आणि ठाकरे गट आक्रमक झाले आहे. दोन्ही गटांनी शिवाजीपार्कवर दावा पेच निर्माण झाला आहे. परंपरेनुसार दसरा मेळावा घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर हायकोर्टाने मोठा निकाल दिला आहे.
अखेर न्यायालयाने आज निकाल दिला. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा झटका बसला आहे. न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
दसरा मेळाव्यात नेमका कुणाला अनुमती द्यावी या मुद्द्यावर अखेर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात मुंबई महापालिका, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट या तीनही पक्षकारांकडून युक्तीवाद केला. तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळून लावली.
पुढे मुंबई हायकोर्टाने मुंबई महापालिकेने स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं सांगताना, अर्जावर निर्णय देताना २० दिवसाचा विलंब केला, मात्र अर्ज नाकारताना बीएमसी आणि पोलिसांमध्ये केवळ एकदिवसात घडामोडी घडल्या असं कोर्टाने नमूद केलं. पोलिसांनी पालिकेला कायदा आणि सुव्यवस्थेचा २१ तारखेला अहवाल दिला. कायदा-सुव्यवस्थेमुळे परवानगी न देण्याचा अहवाल पोलिसांनी दिला होता, असं कोर्टाने म्हटलं.
दोन्ही अर्जांची कल्पना मुंबई महापालिकेला होती. मुंबई महापालिकेकडे शिवसेनेनं अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांचा अहवाल महापालिकेला मिळाला. मात्र, शिवसेनेनं कायदा व सुव्यवस्था राखण्याची हमी दिली. मात्र, महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.