शिवसेनेच्या बंडाळीत दाऊत इब्राहिमची एन्ट्री, एकनाथ शिंदेंचे नव्या ट्विटने मुंबई बाँबस्फोट, दाऊद इब्राहिमचा मुद्दा आला चर्चेत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. गेल्या सहा दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचा गट महाराष्ट्राबाहेर आहे. 50 च्या आसपास आमदारांचा हा गट शिवसेनेच्या विरोधात उभा ठाकला आहे. यावरून राज्याच्या राजकारणामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. शिवसेना आणि शिवसैनिक हे बंडखोर विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत तर बंडखोरी ही शिवसेनेच्या आरोपांंना तोडीस तोड उत्तर देताना दिसत आहे. या सर्व नाट्यमय राजकीय घडामोडीमध्ये आता दाऊतची एन्ट्री झाली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बंडखोर आमदारांवर आज जोरदार टीका केली. यावेळी राऊत म्हणाले की, हे जे 40 लोकं तिकडे आहेत ना ही जिवंत प्रेत आहेत हे लक्षात घ्या, हे मुर्दे आहेत, त्यांच्या बाॅड्या इकडे येणार आहेत, त्यांचा आत्मा मेलेला असेल. लटपटतायेत तिकडे, हे 40 लोक जेव्हा मुंबईत उतरतील तेव्हा जिवंत नसतील मनानं, त्यांना माहित आहे की इथे आग पेटलेली आहे. या आगीमध्ये काय होऊ शकतं, येऊन दाखवावं त्यांना माझं चॅलेंज आहे असे म्हणत राऊत यांनी बंडखोरांविरोधात जोरदार हल्ला चढवला होता.

संंजय राऊत यांच्या याच वक्तव्यावरून बंडखोर शिवसेना आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी राऊत यांचा जोरदार समाचार घेत म्हटले आहे की,हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू असे ट्विट करत शिंदे यांनी आपण आरपारच्या लढाईसाठी सज्ज असल्याचा संदेश शिवसेनेला दिला.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी दाऊतचे भूत पुन्हा महाराष्ट्राच्या राजकीय पटावर जिवंत केले.

दरम्यान शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबई बॉम्बस्फोट आणि दाऊद इब्राहिम ह्या मुद्द्यांच्या संदर्भात नवी राजकीय खेळी केल्याने राज्याच्या राजकारणात दाऊद इब्राहिमची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात आणखीन काय काय घडणार याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.