जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला जातोय. शिंदे यांच्या बंडखोरीविरोधात राज्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.त्यातच आता एकनाथ शिंदे यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे.
शिवसेनेने बंडखोर 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता विधानसभा उपाध्यक्षांनी त्या 16 आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना आपले म्हणणे सादर करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यामुळे सेनेतील बंडाळी आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे.
अश्यातच शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालणारे एक ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या, महाविकास आघाडीचा खेळ ओळखा..! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शनिवारी शिवसेना नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. बंडखोर आमदारांविरोधात सर्वांनीच जोरदार हल्ला चढवला होता, त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी भावनिक ट्विट करून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.