ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता अतितटीवर आला आहे. शिवसेनेतील बंडखोरांविरोधात शिवसेना पर्यायाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. (I will not sit on the lap of those who made dirty allegations against Matoshri and my family – CM Uddhav Thackeray)
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांची संख्या वाढत चालली आहे. शिंदे यांनी आसाममधील गुवाहटीत तळ ठोकला आहे. तेथून शिवसेना विरूद्ध शिंदे गट हा संघर्ष सुरु आहे. शिवसेनेतील बंडखोरी शमवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा हा शासकीय बंगला सोडत मातोश्रीवर आपला मुक्काम हलवला आहे. या कृतीतून ठाकरे यांनी शिवसैनिकासाठी आपली खुर्ची सोडण्यात तयारी दाखवली.
मात्र दुसरीकडे बंडखोर गटात आमदाराची संख्या घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आता निर्णायक वळणावर आला आहे. शिंदे गट विरूद्ध शिवसेना हा संघर्ष कायदेशीर टप्प्यावर जाऊन पोहचला आहे. आमदारांना अपात्र करावे ही मागणी दोन्ही गट करताना दिसू लागले आहेत.
या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसू लागले आहे. तुम्हाला जायचंय तर खुशाल जा.. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे थेट अव्हान उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
उध्दव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, वर्षा सोडली, म्हणजे मी मोह सोडला, पण जिद्द सोडली नाही, माझं मुख्यमंत्रीपद मान्य न करणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे. झाडं न्या, फांद्या न्या, पण मूळ तुम्ही नेऊ शकणार नाहीत असा खणखणीत इशारा देत उध्दव पुढे म्हणतात की, एकनाथ शिंदेंसाठी मी काय नाही केले. नगरविकास मंत्र्यासारखे मोठे खाते दिले. माझ्याकडे असलेली दोन खाती दिली, संजय राठोड यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र मी त्यांना सांभाळून घेतले, मेलो तरी चालेल पण शिवसेना सोडणार नाही, असं म्हणणारेच पळून गेले असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, तुम्हाला जायचंय तर खुशाल जा.. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा असे थेट अव्हान देत ते पुढे म्हणाले, ज्यांनी मातोश्रीवर आणि माझ्या कुटुंबीयांवर घाणेरडे आरोप केले आहेत. त्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसणार नाही असे सांगत ठाकरे यांनी बंडखोरांचे परतीचे दोर तर कापलेच शिवाय भाजप सोबत पुन्हा युती नाही हे जाहीर केले.
आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का ? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसं चालतं ? असा सवाल करत ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला.
मी माझ्या मानेचं ऑपरेशन केलं तेव्हा मोदींनी मला सांगितलं तुम्ही ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही खूप मोठी हिंमत दाखवली. त्यावेळी मी मोदींनाही म्हटलं होतं “हिंमत माझ्या रक्तात आहे” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.