जामखेड टाइम्स वृत्तसेवा: राज्यसभा निवडणुकीत भाजपने 3 तर महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार राज्यसभेची 6 वी जागा शिवसेना आरामात जिंकेल असेच चित्र होते, मात्र महाविकास आघाडीला दगाफटका झाला. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या अचूक नियोजनातून भाजपने धनंजय महाडिक यांचा विजय घडवून आणला.
राज्यसभा निवडणुकीसाठी 10 जून रोजी मतदान पार पडले. मतदानानंत महाराष्ट्राने हाय होल्टेज ड्रामा पहिला. भाजप आणि महाविकास आघाडीने एकमेकांची मते बाद करण्यासाठी थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. निवडणूक आयोगाने आठ तासानंतर निर्णय दिला,यात शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरविण्यात आले.
त्यानंतर मतमोजणी झाली आणि निकाल घोषित झाले. राज्यसभेत शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र संजय पवार यांचा पराभव झाला. हा पराभव महाविकास आघाडीच्या चिंता वाढवणारा ठरला आहे.
शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीशी कोणी दगाफटका केला? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. खासदार संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींवर आज थेट भाष्य केले. राऊत म्हणाले की,घोडे बाजारातील घोड्यांमुळे सरकारवर फरक पडणार नाही, फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत असा टोला लगावत राऊत पुढे म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला.
घोडे बाजारात जे विकले गेले आहेत त्यांची आम्ही नोंद ठेवली आहे, आम्हाला अनेकांनी शब्द दिला होता, मात्र त्यांनी आमच्याशी दगाफटका केला त्यांची यादी आमच्याकडे आहे. शिवसेनेला कोणताही मोठा धक्का लागलेला नाही असे सांगत मतदान न देणाऱ्यांची यादी राऊत यांनी जाहीर केली.
निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एकूण या सर्व घडामोडींवर भाष्य केले यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, आमच्या मित्र पक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही, जे घोडेबाजारात उभे होते त्यांची 6 ते 7 मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कुठल्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही.ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. (sanjay raut on rajya sabha election 2022, names of six MLAs who cheated Mahavikas Aghadi have been announced)
राऊत पुढे म्हणाले, बहुजन विकास आघाडीचे तीन, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी आम्हाला मते दिले नाहीत. राऊत यांनी मते न देणाऱ्या आमदारांची नावे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (sanjay raut on rajya sabha election 2022, names of six MLAs who cheated Mahavikas Aghadi have been announced)