जामखेड टाईम्स वृत्तसेवा | मुंबई। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेसोबत कोणतंही शत्रुत्व नाही, युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, असं विधान काल केलं होतं त्यावर शिवसेना नेते खा संजय राऊत यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (sanjay raut reaction on devendra fadnavis statement) आमचे रस्ते वेगळे आहेत. पण मैत्री कायम आहे. याचा अर्थ आम्ही भाजपसोबत सरकार बनवू असा नाही असे सांगत ठाकरे सरकार (Thackeray government) उत्तम चाललं आहे.आम्ही पाच वर्ष पूर्ण करणारच आहोत. त्यामुळे इतरांनी काळजी करण्याचं कारण नाही,तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचेही शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
संजय राऊत (sanjay raut) म्हणाले, काल देवेंद्रजींनी जे सांगितलं ते बरोबरच आहे.आमच्यात मतभेद आहेत.आम्ही इतकी वर्षे तेच सांगत होतो.आमचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. रस्ते वेगळे आहेत. पण मैत्री कायम आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही सरकार बनवू, असं सांगतानाच परिस्थितीनुसार युती होऊ शकते, याबाबत मला काही माहीत नाही. त्यांच्याकडे अधिक माहिती असू शकते, असा टोला राऊत यांनी फडणवीसांना लगावला.
मोहन भागवत यांनी केलेलं विधान बरोबर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकारांशी संवाद साधला नाही. त्यावर उद्धवजी नक्की पत्रकारांशी नक्की बोलतील असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं विधान बरोबरच आहे. आपण सर्व भारतवासी आहोत, असं त्यांनी सांगितलं.
हा धुऱ्याचा वाद नाही – फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी युतीवर सूचक विधान केलं होतं. “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले. कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही. युतीबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेऊ,” असे फडणवीस म्हणाले होते